राज्यात सुखनैव नांदतात ’ड्रग्ज’ आणि ’सेक्स’ ट्रेड
जय नाईक/ पणजी
गोव्यात सर्वकाही खुलेआम मिळते. जेवढय़ा सहजतेने बाटली मिळते त्याहीपेक्षा सहज बाई आणि प्रसंगी पुरुषही मिळतात, असाच काहीसा समज करून जीवाचा गोवा करण्यासाठी येणाऱया पर्यटकांमुळे देशभरात गोव्याचे नाव बदनाम होत असून त्याची दखल खुद्द केंद्र सरकारने देखील घेतल्यामुळे गोवा हे सेक्स ट्रेडचे प्रमुख ठिकाण असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे.
यापूर्वी गोवा हे ‘ड्रग डेस्टिनेशन’ असल्याचा थेट आरोप हैदराबाद शहर पोलीस आयुक्त सीव्ही आनंद यांनी केला होता. त्याही पुढे जाताना त्यांनी, संपूर्ण देशाला गोव्यातूनच ड्रग्ज पुरवठा होत असल्याचा दावाही केला होता. तरीही गोवा सरकारने त्यांच्यावर कोणतीही कारवाई तर केली नाहीच, उलटपक्षी ज्या प्रकारे दुर्लक्ष केले ते पाहता, आनंद यांच्या दाव्यात तथ्य असल्याचेच सिद्ध झाले होते.
यावरून गोवा राज्य ‘सेक्स’ आणि ‘ड्रग्ज’ यांचे नंदनवन असल्याचे वृत्त सर्वदूर पसरले असून त्यातून स्वतःची प्रतिमा सुधारणे सरकारसाठी शक्यतेबाहेरचे आव्हान बनले आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी वास्कोतील बायणा वेश्यावस्तीवर बुलडोझर फिरवेपर्यंत गोवा केवळ वेश्याव्यवसायासाठीच बदनाम होता. त्याकाळी ‘ड्रग्ज’ हा शब्दसुद्धा अनेकांच्या कानीही पडलेला नव्हता. त्यामुळे येथे येणारे पर्यटक अक्षरशः उताविळ होऊन आधी बायणाकडे धाव घ्यायचे आणि नंतरच उर्वरित गोवा पहायचे. काहींचा हा उताविळपणा एवढा विकोपाला गेलेला असायचा की स्वतःची ओळख, पेशासुद्धा विसरून ते एकदाचा बायणात जीव हलका करायचे. अशाच उतावळेपणातून एकदा महाराष्ट्रातून आलेले शेकडो ‘शिक्षक’ या वस्तीत घुसले होते. ते वृत्त नंतर देशभरात पोहोचल्याने शिक्षकीपेशालाच बट्टा लागला होता. त्यातून शिक्षक स्वतःची पत घालवून बसले होते.
पुरुष ‘एस्कॉर्ट’ सेवा
आज गोव्यात ‘सेक्स’ आणि ‘ड्रग्ज’ सुखनैव नांदत आहेत. हे ‘चक्रव्यूह’ आता भेदण्याच्या पलीकडे पोहोचले आहे. सेक्स व्यवसाय तर केवळ मुली किंवा महिलांपुरताच मर्यादित राहिलेले नाही, ‘मागणी तसा पुरवठा’ तत्वानुसार अनेक पुरुषही त्यात उतरलेले आहेत. त्यासंबंधी पुराव्यांसह कागदपत्रेही सुपूर्द झालेली आहेत. राज्यात येणाऱया पर्यटकांमध्ये पुरुषांच्या बरोबरीनेच महिलांचाही मोठा भरणा असतो. यातील अनेक महिला पुरुषसुखासाठी आलेल्या असतात. त्यांचे पहिले ‘टार्गेट’ हे त्या उतरलेल्या हॉटेलमधील ‘रूम बॉयज्’ असते. एक तर त्या रुमबॉयजचांच वापर करतात किंवा त्यांच्या माध्यमातून अन्य पुरुषांचा सहवास घेतात. याला पुरुष ‘एस्कॉर्ट’ सेवा असे गोंडस नाव देण्यात आले असून मोठमोठय़ा कंपन्या या व्यवसायात उतरल्या आहेत. दिल्लीत बसून गोव्यात महिला-पुरुष एस्कॉर्ट सेवा देणाऱया कंपन्याही उदयास आल्या आहेत.
हे प्रकार आता गोमंतकीयांच्याही एवढे अंगवळणी पडले आहेत की सगळ्यांच्याच भावना बधीर झालेल्या आहेत. आज प्रत्येकालाच पैसा हवा आहे. तो सन्मार्गाने असो वा वाममार्गाने. हाती पैसा खेळता राहिला पाहिजे ही प्रत्येकाची भावना बनली आहे. त्यामुळेच वाळपईसारख्या अत्यंत दुर्गम भागातील युवकसुद्धा ड्रग्ज व्यवसायात उतरले असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
सेक्स ट्रेडचेही तसेच असून आर्थिक असहाय्यतेतून या धंद्यात उतरलेल्या महिलांच्या बरोबरीनेच उच्चभ्रू महिलाही कैवळ चैन म्हणून या मार्गातून सूख आणि पैसाही कमावत आहेत. विनासायास आणि विनागुंतवणूक पैसा कमावण्याचा सेक्स ट्रेडसारखा अन्य व्यवसाय नसल्यामुळे अनेक महिलाही त्यात उतरल्या असून अन्य महिलांना या मायाजालात ओढून गब्बर बनल्या आहेत.
या व्यवसायासाठी स्थानिकांपेक्षा अन्य राज्ये किंवा नेपाळ – बांगलादेश यासारख्या शेजारील देशातूनही तरुणी, महिलांची आयात होत आहे. हाच प्रकार पुरुषांच्या बाबतही होत असून अनेक पुरूष या एस्कॉर्ट सेवेत उतरले आहेत. गेल्या सुमारे 8-10 वर्षांपासून गोव्यात हे प्रकार सुरू असल्याचे वृत्त आहे.
या व्यवसायात उतरलेले बहुतेक पुरुषही बडय़ा दलाल कंपन्यांच्या माध्यमातून सेवा देत असतात. त्यातील 20 टक्के वाटा सदर दलाल कंपनीला देण्याच्या अटीवरच त्यांना भाडय़ाने घेतलेले असतात. या ‘मायाजालात’ उतरण्यापूर्वी त्यांना या एस्कॉर्ट सेवा पुरवणाऱया कंपन्यांच्या वेब ‘मोहजालात’ फसावे लागते. इंटरनेट, ईमेल, फोन आदींच्या माध्यमातून स्वतःची नोंदणी करावी लागते. त्याशिवाय स्वतःला सिद्ध करण्यासाठी ठराविक रक्कमही अनामत म्हणून कंपनीच्या खात्यात भरावी लागते. ही खाती जास्त करून राष्ट्रीय बँकांचीच असतात हे विशेष.
अशा प्रकारे नोंदणीकृत झालेल्या पुरूषांना नंतर मागणीनुसार ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात येते. त्यासाठी त्यांना स्वतःला तंदुरुस्त ठेवावे लागते, तारुण्य टिकविण्यासाठी ब्युटीपार्लर सारख्या माध्यमांचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे कमाईतील अर्धाअधिक हिस्सा तेथे खर्च करावा लागतो. सदर पुरुषाची ओळख लपविणे तसेच पोलिसांपासून संरक्षण देण्याची जबाबदारी सदर कंपनीने घेतलेली असते. अशी हमी मिळत असल्याने अनेक तरुण या व्यवसायात उतरत असल्याची माहिती मिळाली आहे.
नाही म्हणण्यास पोलीस अनेकदा अशा सेक्स रॅकेट’चा पर्दाफाश करतात. परंतु ती कारवाई म्हणजे मटकेवाल्यांवरील धाडीसारखीच असते हेही आता लपून राहिलेले नाही. कोटय़वधींची उलाढाल असलेल्या या व्यवसायात रिक्षा-मोटरसायकल पायलट पासून हॉटेल रुमबॉय ते सप्लायर कंपनी या सर्वांचे खिशे भरत असल्याने पोलिसही त्यांच्या वाटेला जाण्यापेक्षा वाटय़ाला जाण्यातच धन्यता मानतात हेही ‘ओपन सिक्रेट’ आता सर्वांना ज्ञात झाले आहे.









