मुंबई / वृत्तसंस्था
पंजाब किंग्सविरुद्ध शेवटच्या चेंडूपर्यंत अटीतटीने लढल्या गेलेल्या साखळी सामन्यात संजू सॅमसनचा एकेरी धाव नाकारुन स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय योग्यच होता, अशा शब्दात राजस्थान रॉयल्सचे संघ संचालक कुमार संगकारांनी त्या निर्णयाची पाठराखण केली. त्याने स्वतःहून ही जबाबदारी आपल्याकडेच ठेवली, हे कौतुकास्पद होते, असे ते म्हणाले.
कर्णधार सॅमसनने 63 चेंडूत 12 चौकार, 7 षटकारांसह शतकी खेळी साकारली. पण, अर्शदीपच्या शेवटच्या चेंडूवर षटकार खेचण्यात त्याला अपयश आले. त्यापूर्वी 2 चेंडूत 5 धावांची गरज असताना त्याने एकेरी धाव घेणे नाकारले होते. त्या पार्श्वभूमीवर संगकारा बोलत होते.
‘सॅमसनने शेवटच्या चेंडूवर जवळपास षटकार खेचलाच होता. जेव्हा फॉर्म असतो, त्यावेळी असे धोके स्वीकारणे योग्यच असते. शिवाय, यातून त्या खेळाडूचा लढवय्या, आक्रमक बाणाही दिसून येतो’, असे संगकाराने पुढे नमूद केले. नवोदित मध्यमगती गोलंदाज चेतन साकारिया व फलंदाज रियान परागच्या योगदानाचीही त्यांनी प्रशंसा केली.
‘रियान हा खास खेळाडू आहे. त्याच्याकडे गुणवत्ता आहे. शमीच्या बंपरला सामोरे जाताना तो वेळीच बॅट खाली आणू शकला नाही. अन्यथा, वेगळे चित्र दिसू शकले असते. रियान व संजू सॅमसन यांची भागीदारी अव्वल दर्जाची होती. युवा खेळाडूंकडून आम्हाला यामुळे आणखी भरीव अपेक्षा आहेत’, असे ते म्हणाले.
रियान परागने 11 चेंडूत 25 धावा फटकावताना सॅमसनसह 52 धावांची भागीदारी साकारली होती. दुसरीकडे, साकारियाने पदार्पणातच 3 बळी व एक अप्रतिम झेलही घेतला होता. चेतन साकारिया हा टेम्पो ड्रायव्हरचा मुलगा असून त्याच्या एका भावाने जानेवारीतच आत्महत्या केली आहे. यातून हे कुटुंब पुरते सावरलेले देखील नाही. या प्रतिकूल स्थितीतही चेतनने उत्तम पदार्पण केले आहे. राजस्थानने यंदाच्या हंगामासाठी त्याला 1.2 कोटी रुपयांना करारबद्ध केले आहे.









