वृत्तसंस्था/ सेंट पीटर्सबर्ग (रशिया)
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या सेंट पीटर्सबर्ग चषक खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत टॉप सीडेड मारिया सॅकेरीने उपांत्य सामन्यात इरिना बेगुचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. त्याचप्रमाणे द्वितीय मानांकित ऍनेट कोंटाव्हेटने अंतिम फेरी गाठताना ओस्टापेंकोचा पराभव केला.
शनिवारी झालेल्या महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात सॅकेरीने बेगुचा 6-4, 6-7 (4-7), 6-4 अशा तीन सेट्समधील तीन तासाच्या मॅरेथॉन लढतीत पराभव करत अंतिम फेरी गाठली. दुसऱया उपांत्य सामन्यात द्वितीय मानांकित कोंटाव्हेटने सातव्या मानांकित ओस्टापेंकोवर 6-3, 6-4 अशी मात केली. या स्पर्धेतील पहिल्या उपांत्य सामन्यात सॅकेरीला विजयासाठी तब्बल तीन तास झगडावे लागले. सॅकेरी आता डब्ल्यूटीए टूरवरील स्पर्धेत एकेरीचे चौथे जेतेपद मिळविण्यासाठी प्रयत्न करेल.