अमेरिकेच्या खगोल शास्त्रज्ञांना मिळताहेत संकेत
@ वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
केवळ सूर्यमालेतच नव्हे, तर आतापर्यंतच्या ज्ञात विश्वातही सजीव सृष्टी असणारा किंवा सजीव सृष्टीला पोषक वातावरण असणारा एकच ग्रह आहे आणि तो म्हणजे आपली पृथ्वी, असा अगदी परवा परवापर्यंत समज होता. तथापि, तो दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपल्या सूर्यमालेतच आणखी पृथ्वी दडली असून ती शनी या दुसऱया क्रमांकाच्या मोठय़ा ग्रहाभोवती फिरत आहे. ही पृथ्वी म्हणजे शनीचा उपग्रह टायटन आहे आहे, असा निष्कर्ष संशोधकांचा आहे.
टायटन या उपग्रहावर पृथ्वीप्रमाणे पाण्याच्या नद्या, जलायश आणि जलस्रोत असल्याचे संशोधनात दिसून आले आहे. शनी या ग्रहाभोवतील असंख्य कडी आहेत. तसेच त्याचे 50 हून अधिक चंद्र किंवा उपग्रह आहेत. टायटन हा त्यापैकी एक असून त्याचा आकार पृथ्वीपेक्षा थोडासा लहान आहे.
पाणी व मिथेनचे अस्तित्व
या उपग्रहावर नेहमी पर्जन्यवृष्टी होत असते. त्यावरील वातावरण जाडसर आहे. शनीच्या या चंद्राचा पृष्ठभाग वालुकामय आहे. वाळूची वादळेही तेथे होत असतात. पृथ्वीवर ज्या प्रमाणे ऋतू असतात तसे टायटनवरही आहेत. येथे पथ्वीप्रमाणे समुद्र आहेत. गोडे पाणीही असू शकते. मात्र, येथील जलाशयांमध्ये पृथ्वीवरील जलाशयांपेक्षा वेगळय़ा प्रकारची खनीज द्रव्ये आहेत. येथे द्रवरुप मिथेनचे प्रमाण फार मोठे आहे. या मिथेनचा पाऊस येथे पडतो. नायट्रोजनचे वारे वाहतात.
जीवसृष्टी आहे काय
मात्र, सर्वात मुख्य प्रश्न या उपग्रहावर जीवसृष्टी आहे काय आणि असल्यास कोणत्या स्वरुपातील, हा प्रश्न आहे. सध्यातरी येथे जीवसृष्टी असल्याचे जाणवत नाही. एक तर हा उपग्रह सूर्यापासून इतका दूर आहे की तेथे अतिशय अंधूक सूर्यप्रकाश पडतो. इतक्या कमी सूर्यप्रकाशात आपल्या पृथ्वीप्रमाणे समृदृ आणि विविधांगी जीवसृष्टी अस्तित्वात येऊ शकत नाही. मात्र, येथे तीव्र थंडी आणि मिथेनच्या वातावरणात तग धरु शकणारे अतीसूक्ष्म जीवाणू असू शकतात.
भविष्यात कधीतरी… आजपासून अब्जावधी वर्षांनंतर सूर्याचा आकार वाढून त्याची उष्णताही वाढल्यानंतर या उपग्रहावर पुरेशा प्रमाणात उष्णता पोहचून तेथे अधिक प्रगत जीवसृष्टी निर्माण होऊ शकते, असे संशोधकांचे मत आहे. मात्र, या जीवसृष्टीचा पृथ्वीशी संपर्क येणे मात्र संभवत नाही, असे संशोधकांचे म्हणणे आहे.









