विजापूर जिल्हय़ात 54 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह : जिल्हाधिकारी वाय. एस. पाटील यांची माहिती
वार्ताहर/ विजापूर
निजामुद्दीन येथील तबलिग कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या दहा जणांची ओळख पटली होती. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवून देण्यात आले आहे. तसेच मागील आठवडय़ात गुजराथमधील सूरत येथील जमात कार्यक्रमात भाग घेऊन आलेले 10 जण इंडी तालुक्यातील नागठाण येथे सापडले होते. त्यांना विजापूर येथे उपचारासाठी आणण्यात आले होते. यापैकी दोघांना ताप, सर्दीचा त्रास होत होता. त्यांचे रक्त व स्वॅब कलबुर्गी (गुलबर्गा) येथे तपासणीसाठी पाठवून देण्यात आले आहेत. त्यांचा रिपोर्ट येईपर्यंत त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख अनुपम अगरवाल व जिल्हाधिकारी वाय. एस. पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले, हे सर्व 10 जण सुरतहून महाराष्ट्रमार्गे तालुक्यातील नागठाण येथे आले होते. ते सर्वजण सूरतचे रहिवाशी आहेत. तसेच आतापर्यंत विजापूर जिल्हात 416 जण क्वारंटाईन होते. तर सध्या 9 जण क्वारंटाईन आहेत. एकूण 17 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले हेते. त्यापैकी 54 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. अजून तिघांचे रिपोर्ट यायचे आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी वाय. एस. पाटील यांनी दिली. तसेच शहरात व जिल्हय़ात लॉकडाऊनला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
डॉ. नरसापूर यांच्याकडून मदतनिधी
येथील डॉ. नरसापूर यानी आज 6 रोजी जिल्हाधिकारी वाय. एस. पाटील यांच्याकडे एक लाख रुपयाचा धनादेश पंतप्रधान रिलीफ फंडाकरिता सुपूर्द केला. तसेच तेजस्वीनी अनंतकुमार यांच्या एनजीओ फंडालाही एक लाख रुपयाचा धनादेश दिला.









