जी-20 शिखर परिषदेची तयारी अंतिम टप्प्यात
यंदाची ‘जी-20’ शिखर परिषद नवी दिल्ली येथे 9-10 सप्टेंबरला होणार आहे. या परिषदेत अनेक देशांच्या नेत्यांसोबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हेदेखील सहभागी होण्यासाठी नवी दिल्लीत पोहोचणार आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद होत असून जगातील प्रमुख देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. दिल्लीतील प्रगती मैदानावरील ‘भारत मंडपम’च्या भव्य दालनात ही समिट होत असून संपूर्ण जगाला भारताची ताकद आणि वाढती उंची या शिखर परिषदेच्या माध्यमातून दिसणार आहे.
‘जी-20’ मधील भारताचे अध्यक्षपद 1 डिसेंबर 2022 रोजी सुरू झाले. मागील वर्षी बाली शिखर परिषदेत इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांच्याकडून भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अध्यक्षपद हस्तांतरित करण्यात आले. इंडोनेशियाने 2022 मध्ये अध्यक्षपद भूषविले. त्यानंतर गेल्या आठ-दहा महिन्यात भारताने विविध पातळीवर देशाच्या कानाकोपऱ्यात अनेक उपक्रमांनी मंत्रिस्तरीय आणि समूहगट प्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठका घेण्यात आल्या. आता महत्वाची शिखर परिषद 9-10 सप्टेंबरला होत असून त्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. शिखर परिषदेत 19 देशांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. याशिवाय युरोपियन युनियनही या परिषदेत सहभागी होणार आहे. तसेच नऊ देशांचे प्रमुख पाहुणे देश म्हणून बैठकीत सहभागी होणार आहेत.
जी-20 परिषदेच्या अध्यक्षपदामुळे भारताला आंतरराष्ट्रीयदृष्ट्या महत्वाच्या मुद्यांवर जागतिक कार्यक्रमात योगदान देण्याची अद्वितीय संधी प्राप्त झाली आहे. सध्याच्या जागतिक अस्वस्थेची झळ भारतालाही बसत असली तरी अन्य देशांच्या तुलनेत भारतात स्थैर्य आहे. जागतिक नेते भारताला भेट देत असताना पर्यावरणपूरक विकास, ऊर्जा सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य या क्षेत्रातही भारत जगाचे नेतृत्व करण्यास सक्षम असल्याचे दाखवून देण्याची चांगली संधी चालून आली आहे. इंडोनेशियातील बाली येथे आयोजित बैठकीत भारत महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याची झलक जगाला पाहायला मिळाली होती.

‘जी-20’ ही जगातील 20 प्रमुख अर्थव्यवस्थांमधील अर्थमंत्र्यांची आणि केंद्रीय बँक गव्हर्नरांची एक संघटना आहे. यामध्ये 20 देश आणि युरोपीय संघाचा समावेश आहे. याचे प्रतिनिधित्व युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष आणि युरोपियन सेंट्रल बँक करतात. 1999 साली आग्नेय आशियात आलेल्या आर्थिक संकटाचा एकत्रित सामना करण्यासाठी ‘जी 20’ या गटाची निर्मिती झाली. सध्या ही बैठक अध्यक्षीय पातळीवर पार पडत असून त्यात मुख्यत: आर्थिक विषयांवर चर्चा होतात. तसेच गेल्या काही वर्षांमध्ये त्यात विस्तार होऊन व्यापार, वातावरणातील बदल, चिरस्थायी विकास, आरोग्य, कृषी, पर्यावरण आणि भ्रष्टाचाराविरोधात संयुक्त लढा या विषयांचाही समावेश झाला आहे.
‘जी-20’चे सदस्य देश
अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, पॅनडा, चीन, युरोपियन युनियन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, कोरिया गणराज्य, तुर्की, ब्रिटन आणि अमेरिका.
अजेंडा प्राधान्यक्रम
हरित विकास, हवामान वित्त आणि जीवन
प्रवेगक, सर्वसमावेशक आणि लवचिक वाढ
‘सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स’मध्ये प्रगती साधणे
तांत्रिक परिवर्तन व डिजिटल सुविधा विकास
एकविसाव्या शतकासाठी बहुपक्षीय संस्था
महिलांच्या नेतृत्वाखाली विकासात नवी झेप
आफ्रिकन युनियनच्या समावेशासाठी प्रयत्न
‘वसुधैव कुटुम्बकम्’…
► ‘जी-20’ परिषद बैठकीची संकल्पना ‘वसुधैव कुटुम्बकम्’- ‘एक वसुंधरा, एक कुटुंब, एक भविष्य’ अशी असून 20 पाकळ्या असलेल्या कमळातील पृथ्वी हे तिचे चिन्ह आहे. या बैठकीचा मुख्य विषय पर्यावरणस्नेही जीवनशैली हा आहे.
► या बैठकीला अमेरिका, रशिया, जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स, चीन, सौदी अरेबिया, ब्राझील, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया आणि मेक्सिकोसह जगातील सर्वात मोठ्या 20 अर्थव्यवस्था असलेल्या देशांचे अध्यक्ष किंवा पंतप्रधान उपस्थित राहतील.
► अलिकडच्या वर्षात भारताने संयुक्त राष्ट्र, सुरक्षा परिषद, जागतिक व्यापार संघटना आणि जागतिक आरोग्य संघटना यांसारख्या विविध आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर आपली स्वतंत्र प्रतिमा निर्माण केल्याचा लाभ भारताला मिळू शकतो.
महत्वाच्या नोंदी…
►जी-20 अध्यक्षता भारताला आंतरराष्ट्रीयदृष्ट्या महत्वाच्या मुद्यांवर जागतिक कार्यक्रमात योगदानाची संधी देत असल्याने भारताचे महत्व वाढणार.
► जी-20 परिषदेच्या अध्यक्षतेदरम्यान भारतभर विविध ठिकाणी वेगवेगळ्या 32 क्षेत्रांच्या अंतर्गत सुमारे 200 बैठका आयोजित केल्या गेल्या.

‘भारत मंडपम’ सज्ज
शिखर परिषदेसाठी प्रगती मैदानावरील पुनर्विकसित ‘आयटीपीओ’ संकुल म्हणजेच ‘भारत मंडपम’ सज्ज झाले आहे. या भव्य संकुलामध्ये सप्टेंबरमध्ये जी-20 नेत्यांची बैठक होणार आहे. प्रगती मैदान कॉम्प्लेक्स या नावानेही ओळखले जाणारे हे ठिकाण सुमारे 123 एकर क्षेत्रात विस्तारले आहे. हे ठिकाण देशातील सर्वात मोठे एमआयसीई (मीटिंग्ज, इन्सेन्टिव्ह, कॉन्फरन्स आणि एक्झिबिशन) डेस्टिनेशन म्हणून ओळखले जात आहे. या संकुलातील कन्व्हेन्शन सेंटर-3 मध्ये 7,000 लोकांची आसन क्षमता असून ते ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित सिडनी ऑपेरा हाऊसच्या 5,500 इतक्या आसन क्षमतेपेक्षा मोठे आहे. तसेच 3,000 लोकांच्या आसनक्षमतेचे भव्य अॅम्पी थिएटरही साकारण्यात आले आहे. या संकुलाच्या भव्यतेमुळे ते जागतिक पातळीवरील मेगा कॉन्फरन्स, आंतरराष्ट्रीय शिखर परिषद आणि सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यासाठी एक योग्य ठिकाण बनवण्यात आले आहे. येथील रस्ते सिग्नलमुक्त असून पाहुण्यांना कोणत्याही त्रासाशिवाय सुलभतेने घटनास्थळी पोहोचता येणार आहे. या इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरला ‘भारत मंडपम’ असे नाव देण्यात आले असून गेल्या महिन्यात पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत त्याचे राष्ट्रार्पण करण्यात आले होते.
विदेशी पाहुण्यांची मांदियाळी
दिल्लीत 23, एनसीआरमध्ये 9 हॉटेल्स बुक
► शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी 19 देशांचे प्रतिनिधी-नेते नवी दिल्लीत पोहोचणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह इतर पाहुण्यांना राहण्यासाठी हॉटेल्सची निवड करण्यात आली आहे. परदेशी पाहुण्यांना दिल्लीतील 23 आणि एनसीआरमधील 9 हॉटेल्समध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. सर्व हॉटेल्सचे सिक्मयुरिटी ऑडिट पूर्ण झाले आहे. एनसीआरमध्ये समाविष्ट असलेली बहुतांश हॉटेल्स गुरुग्राममध्ये आहेत.
► अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बायडेन आयटीसी मौर्य हॉटेलच्या 14 व्या मजल्यावर असलेल्या प्रेसिडेंशियल सूटमध्ये राहतील. या हॉटेलमधील सुमारे 400 रुम्स उच्चाधिकाऱ्यांसाठी बुक करण्यात आल्या आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग ताज पॅलेस हॉटेलमध्ये तर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे शांग्री-ला हॉटेलमध्ये मुक्काम करणार आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे क्लेरिजेस हॉटेलमध्ये मुक्काम करणार आहेत. तर ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासाठी हॉटेल इम्पिरियल बुक करण्यात आले आहे.
► विदेशी पाहुण्यांना ने-आण करण्यासाठी करोडो रुपयांची आलिशान वाहने खरेदी केली जात आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने 150 आलिशान गाड्यांची मागणी केली आहे. प्रतिनिधी-अधिकाऱ्यांच्या दिमतीसाठी मर्सिडीज एस क्लास, मर्सिडीज ई क्लास, बीएमडब्ल्यू, ऑडी यांसारख्या गाड्यांना मोठी मागणी आहे. या लक्झरी वाहनांमध्ये प्रवास करणे केवळ आरामदायीच नाही, तर उच्च सुरक्षेचे सर्व मानदंड पूर्ण आहेत.

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना ‘चाणक्य’ची भुरळ
आयटीसी मौर्य हॉटेलच्या 14 व्या मजल्यावर असलेल्या प्रेसिडेंशियल सूटला ‘चाणक्य’ असे नाव देण्यात आले आहे. सुमारे 4,600 स्क्वेअर फूटच्या चाणक्य सूटमध्ये अभ्यासिका, लिव्हिंग रुम, एक जिम, मिटींग हॉल, डायनिंग हॉल आणि रिसेप्शन यांच्यासह एक मिनी स्पादेखील आहे. या सूटसाठी स्वतंत्र लिफ्ट आहे. 2015 मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारतात आले असताना त्यांच्यासाठीही चाणक्य सूट बुक करण्यात आला होता. तसेच 2020 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची व्यवस्था तेथे करण्यात आली होती. त्यांच्यापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश, बिल क्लिंटन आणि जिमी कार्टर हे देखील आयटीसी मौर्य येथील प्रेसिडेंशियल सूटमध्ये राहिले होते.
अभेद्य सुरक्षा सज्जता
शिखर परिषदेदरम्यान दिल्लीत अभेद्य सुरक्षा चक्राची योजना तयार आहे. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या तुलनेत जी-20 परिषदेसाठी येणाऱ्या नेत्यांसाठी अधिक सुरक्षा व्यवस्था असेल, असे सांगण्यात येत आहे. दिल्लीच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत सुरक्षा यंत्रणांकडून जोरदार तयारी सुरू आहे. सर्व सुरक्षा दले सतर्क असून बहुस्तरीय सुरक्षेचे नियोजन जवळपास पूर्ण झाले आहे. देशाच्या विविध भागातील डीसीपी, अतिरिक्त सीपी, जॉईंट सीपी आणि स्पेशल सीपी दर्जाच्या 30 ते 40 आयपीएस अधिकाऱ्यांना जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे. या सर्व आयपीएएस अधिकाऱ्यांनी परदेशी तपास यंत्रणांच्या सहाय्याने सुरक्षा व्यवस्था निश्चित केली आहे. सुरक्षेबरोबरच अत्याधुनिक ऊग्णवाहिका आणि अग्निशमन वाहनेही तैनात करण्यात आली आहेत









