नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
देशाला दोन ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या कुस्तीपटू सुशील कुमार याला पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांनी एक लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे. दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमवर कुस्तीपटू सागर धनखड याची हत्या झाली आणि त्यानंतर सुशील फरार आहे.
दिल्ली पोलिसांनी रात्री बक्षीस रक्कम जाहीर केली. सुशीलवर अजामीनपात्र वॉरंट जाहीर झाला आहे. तसेच त्याच्यावर लुकआऊट सर्क्युलरही जारी झाला आहे. दिल्ली पोलिसांनी या घटनेची माहिती दिल्ली सरकारलाही दिली आहे.
नवी दिल्ली येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या हाणामारीत कनिष्ठ गटातील कुस्तीपटू सागर धनखड याची हत्या झाली आणि त्यात सुशील कुमारला दोषी ठरवण्यात आले आहे. त्या घटनेनंतर सुशील कुमार गायब झाला आहे आणि पोलिसांनी आता त्याची माहिती देणाऱ्यास १ लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे. सुशीलला पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांचे विविध ठिकाणी छापेसत्र सुरू आहे. सुशीलसह या घटनेतील दुसरा आरोपी अजय याच्यावरही ५० हजारांचे बक्षीस जाहीर केले गेले आहे.