नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
देशाला दोन ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या कुस्तीपटू सुशील कुमार याला पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांनी एक लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे. त्यातच सुशील कुमारने दिल्ली कोर्टात पोलिसांच्या अटकेपासून सरंक्षण मिळावं म्हणून अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र सुनावणीवेळी सुशील कुमरचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे दिल्ली पोलीस सुशील कुमारला कधीही अटक करू शकतात.
सुशील कुमार विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं असून त्याची माहिती देणाऱ्यासाठी एक लाखांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं आहे. आता कोर्टाने देखील अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे सुशील कुमारच्या अडचणी वाढल्या आहेत.
नवी दिल्ली येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या हाणामारीत कनिष्ठ गटातील कुस्तीपटू सागर धनखड याची हत्या झाली आणि त्यात सुशील कुमारला दोषी ठरवण्यात आले आहे. त्या घटनेनंतर सुशील कुमार गायब झाला आहे आणि पोलिसांनी आता त्याची माहिती देणाऱ्यास १ लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे. सुशीलला पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांचे विविध ठिकाणी छापेसत्र सुरू आहे. सुशीलसह या घटनेतील दुसरा आरोपी अजय याच्यावरही ५० हजारांचे बक्षीस जाहीर केले गेले आहे.