ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबई महानगरपालिकेने शुक्रवारी बिहारमधील पाटण्याचे आयपीएस विनय तिवार यांचे क्वारंटाइन समाप्त केले आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येचा तपास करण्यासाठी आलेले विनय तिवारी यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना 14 दिवस क्वारंटाइन केले होते. ते बिहारहून मुंबईला आले होते.

विनय तिवारी सायंकाळी साडेपाच वाजता मुंबईतून पाटण्याला रवाना होतील. बीएमसीने विनय तिवारी यांना मेसेजद्वारे क्वारंटाइन समाप्त करत आल्याची माहिती दिली. त्याचबरोबर, बीएमसीनेही या आदेशाची प्रत बिहार पोलिस मुख्यालयात पाठविली आहे. विनय तिवारी यांना फोनवर सांगण्यात आले आहे की, संध्याकाळी 5 ते 5.30 वाजताचे विमान आहे. हे विमान कनेक्टिंग आहे. व्हाया हैदराबाद असून ते पाटण्याला जाणार आहे.
दरम्यान, सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस अधिकारी विनय तिवारी हे विमानाने मुंबईत आले होते. मात्र, विमानाने आंतरराज्य प्रवास करणाऱ्या व्यक्तींना क्वारंटाइन करण्याचा नियम असल्याने मुंबई महापालिकेने त्यांना 14 दिवसांसाठी क्वारंटाइन केले होते. यावरुन वादही निर्माण झाला होता. त्यानंतर त्यांना सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तपास करण्याची मुभा पालिकेने दिली होती.









