प्रतिनिधी / पणजी :
हिंदी चित्रट अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यासाठी अमलीपदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) पथक गोव्यात दाखल झाले आहे. गोव्यात रिसॉर्ट असलेला गौरव आर्या नामक एक उद्योजक या प्रकरणात एनसीबीच्या रडारखाली आला आहे. त्यामुळे गौरवचा शोध घेण्यासाठी एनसीबीचे पथक गोव्यात दाखल झाले आहे. एनसीबीने याबाबत कमालीची गुप्तता पाळली आहे.
सुशांतच्या मृत्यूप्रकरणाचा अमलीपदार्थाशी संबंध उघडकीस आल्यामुळे एका वेगळ्या दृष्टिकोनातून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. मुख्य संशयित रिया चक्रवर्ती व गौरव आर्या यांच्यातील कथित सोशल मीडिया चॅट हाती लागल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे. एनसीबीचे पश्चिम विभागीय पथक यासाठी गोव्यात दाखल झाले आहे.
रेव्ह पार्टीचा तपास जारी
दरम्यान 16 ऑगस्ट रोजी गोव्यात रेव्ह पार्टी झाली होती. गोवा सीआयडीने कारवाई करून ती बंद पाडली होती. या पार्टीत अमलीपदार्थाचा वापर झाला होता. या कारवाईत 9 लाख रुपये किमंतीचा अमलीपदार्थ जप्त केला होता. हा अमलीपदार्थ कुठून आला होता याचा तपास सीआयडी पोलीस करीत आहेत.









