ऑनलाईन टीम / मुंबई :
सुशांतला न्याय देणे हेच मुंबई पोलीस आणि सरकारचे दायित्व आहे. सुशांत सिंह राजपूत हा महाराष्ट्राचा मुलगा होता आणि महाराष्ट्र पोलिसांकडून योग्य रीतीने तपास सुरू आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी संजय राऊत यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
बिहारमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एका व्यक्तीच्या मृत्यूचे राजकारण केले जात आहे. बिहारचे डीजीपी राजकीय हेतूने चौकशीची मागणी करत आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आदित्य ठाकरेंचा या प्रकरणाशी काही संबंध नसून एका पुढे येऊ घातलेल्या युवा नेतृत्त्वाला मानसिक त्रास देण्यासाठी आणि महाराष्ट्र सरकारची बदनामी करण्यासाठी हे राजकारण केले जात आहे . हिम्मत असेल तर भाजपने आदित्य ठाकरे यांचे नाव घेऊन दाखवावे, असेही राऊत यांनी यावेळी म्हटले आहे.









