ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कॅलिफोर्निया राज्य विधानसभेने दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याला मरणोत्तर पुरस्कार आहे. भारतीय चित्रपट आणि संस्कृतीतील योगदानासाठी त्याला हा पुरस्कार देण्यात आला आहे. सुशांतची बहीण श्वेता कीर्ती सिंग हिने हा पुरस्कार स्वीकारला. श्वेता कीर्ती सिंगने सोशल मीडियावर यासंदर्भात माहिती दिली आहे.
15 ऑगस्ट भारताच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कॅलिफोर्नियाने सुशांतचा सन्मान केला आहे. सुशांतने अनेक सामाजिक कार्यांमध्ये वाटा उचलला होता. त्याच्या या कार्याचे कौतुक म्हणून त्याचा मरणोत्तर सन्मान करण्यात आला आहे.

सुशांतच्या बहिणीने या प्रमाणपत्राचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ‘भारतीय सिनेमातील योगदानासाठी कॅलिफोर्निया राज्य विधानसभेकडून सुशांतला हा पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या संकटाच्या काळात त्यांनी पाठिंबा दिल्याबद्दल मी विधानसभा सदस्यांचे आणि भारतीय वंशाच्या अमेरिकन समुदायाचे आभार मानते’, असे सुशांतची बहीण श्वेता कीर्ती सिंगने म्हटले आहे.
सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला एक महिना उलटून गेला आहे. सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणात आत्तापर्यंत मुंबई पोलिसांकडून अनेक लोकांची चौकशी करण्यात आली आहे. सध्या मुंबई पोलीस, बिहार पोलीस आणि ईडीच्या माध्यमातून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.









