कमी प्रकाशात शवविच्छेदन केल्याचा दावा
प्रतिनिधी/ मुंबई
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या शवविच्छेदन अहवालावर एम्सच्या पथकाने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. कमी प्रकाशात शवविच्छेदन केल्याचा दावा या पथकाने केला आहे. तर एम्सच्या अहवालानुसार सीबीआयचा तपास सुरू झाला आहे.
सीबीआयचे एक पथक दिल्लीला रवाना झाले असून, तेथून त्यांनी सध्या तपासाची चक्रे फिरविण्यास सुरुवात केली आहे. सिद्धार्थ पिठाणी याची पुन्हा एकदा चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती सीबीआयने दिली आहे.
आत्महत्येच्या एक दिवस आधी सुशांत-रियाची भेट
सुशांतच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी रिया आणि सुशांतची भेट झाली होती, हे सांगणारा एक साक्षीदार सापडला आहे. सुशांतची बहीण श्वेता किर्ती सिंहने हा खुलासा केला आहे. श्वेताने एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये तिने म्हटले आहे की, ‘ही गेमचेंजर बातमी आहे. रिया माझ्या भावाला 13 जूनच्या रात्री भेटली होती, हे सांगणारा एक साक्षीदार आहे. 13 जूनच्या रात्री नेमके काय झाले होते, ज्यानंतर दुसऱया दिवशी 14 जूनला सकाळी माझा भाऊ मृतावस्थेत सापडला ?’. आपण 8 जूनला सुशांतचे घर सोडले. तेव्हा त्याची बहीण मीतू त्याच्यासोबत राहायला आली होती. त्यानंतर सुशांतला मी भेटलेच नाही, असे रियाने सांगितले होते. मात्र आता श्वेताच्या या ट्विटमुळे खळबळ उडाली आहे. हा साक्षीदार म्हणजे सीबीआयच्या तपासात महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो.
रिया-शौविकला होऊ शकतो 20 वर्षांचा तुरुंगवास
दुसरीकडे या प्रकरणाचा ड्रग्ज अँगलने तपास करणाऱया एनसीबीला रियाच्या घरातून दीड किलो ड्रग्ज जप्त केले आहे. यामध्ये चरस आणि गांजा आहे. यामुळे आता रिया आणि तिचा भाऊ शौविकला 10 ते 20 वर्षे तुरुंगवास होऊ शकतो, अशी माहिती तपास अधिकाऱयाने दिली आहे. रिया, शौविकच्या जामीन याचिकेवर 29 सप्टेंबरला सुनावणी झाली. मुंबई हायकोर्टाने याबाबतचा निर्णय राखून ठेवला आहे. हा निर्णय येण्याआधीच रियाच्या घरात ड्रग्ज सापडले आहे. एनसीबीला मोठा पुरावा सापडला आहे. त्यामुळे रियाच्या अडचणीत आता वाढ झाली आहे.








