ऑनलाईन टीम / मुंबई :
बॉलीवुड अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. त्यातच आता एम्स रुग्णालयातील विशेष पथकाने आपला संपूर्ण अहवाल सीबीआयकडे सुपूर्द केला आहे.
या अहवालात हत्येचा दावा फेटाळला असून सुशांतने आत्महत्या केल्यावर शिक्कमोर्तब केले आहे. या रिपोर्टमध्ये म्हटले की सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली नसून, हे प्रकरण आत्महत्येचेच असल्याचा दावा अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सच्या विशेष पथकाने केला आहे.
सुशांत सिंह राजपूतने 14 जूनला आत्महत्या केली केली होती. मात्र, सुशांत आत्महत्या करूच शकत नाही, त्याची हत्या करण्यात आल्याचा दावा त्याच्या कुटुंबाने केला होता. सुशांतच्या चाहत्यांनीही त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत, त्याला न्याय मिळावा म्हणून सोशल मीडियावर अनेक मोहिमा राबवल्या होत्या. यानंतर सुशांत आत्महत्या प्रकरण, हत्येच्या संशयामुळे सीबीआयकडे सोपवण्यात आले.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात हत्येसह अनेक संशय व्यक्त करण्यात आले होते. मुंबईच्या कूपर रुग्णालयात सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले होते. मात्र, या शवविच्छेदन अहवालात योग्य माहिती न देण्यात आल्याने कूपर रुग्णालयाच्या या अहवालावरदेखील संशय व्यक्त करण्यात आला होता. यामुळे एम्सच्या डॉक्टरांचे एक विशेष पथक नेमून या अहवालाचा पुन्हा अभ्यास केला गेला.
एम्सच्या या विशेष पथकाने सुशांतचा व्हिसेरा अहवाल सादर केला. या अहवालानुसार सुशांतवर कुठलाही विषप्रयोग करण्यात आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच हत्या झाल्याचे कुठलेही पुरावे नसून, सर्व गोष्टी त्याने आत्महत्या केली असावी याकडेच इशारा करतात, असेही त्यांनी म्हटले आहे.
एम्सच्या या अहवालानंतर सीबीआय काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.