भाजपमध्ये प्रवेश करण्याची तयारी, तृणमूल नाराज
वृत्तसंस्था / कोलकाता
तृणमूल काँगेसचे बंडखोर नेते सुवेंदु अधिकारी यांनी आपल्या आमदारपदाचाही आता त्याग केला आहे. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असून या पक्षप्रवेशाची तयारी म्हणूनच त्यांनी आमदारपद सोडले असल्याचे बोलले जात आहे. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून त्यांचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी मतभेद झालेले असून काही आठवडय़ांपूर्वी त्यांनी मंत्रिपदाचाही त्याग केला आहे.
आपले त्यागपत्र त्यांनी राज्य विधानसभेच्या अध्यक्षांकडे बुधवारी पाठविले. आपल्या त्यागपत्रावर त्वरित निर्णय घेऊन ते संमत करावे आणि आपल्याला आमदारपदाच्या उत्तरदायित्वातून मुक्त करावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.
ममता बॅनर्जी मंत्रिमंडळात त्यांच्याकडे जलसिंचन आणि वाहतूक अशी महत्वाची खाती होती. बॅनर्जींवर त्यांनी हुकुमशाहीचा आणि अरेरावीपणाचा आरोप केला होता. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांनी राज्यात विविध ठिकाणी जाहीर सभा घेऊन बॅनर्जी यांच्या विरोधात मोठी आघाडी उघडली
होती.
प्रयत्न थांबविले
त्यांनी पक्ष सोडू नये म्हणून तृणमूल काँगेसच्या अनेक नेत्यांनी प्रयत्न चालविले होते. मात्र त्यांनी पदत्यागाचा निर्णय बदलला नाही. आता तृणमूल काँगेसने त्यांचे मनपरिवर्तत करण्याचे प्रयत्न थांबविले आहेत. तसेच ते बाहेर गेल्याने पक्षाला कोणताही फरक पडत नाही. त्यांनी पक्षाचा
विश्वासघात केला आहे, अशी टीकाही अनेक तृणमूल नेत्यांनी केली. ममता बॅनर्जी यांनी आपल्याला सातत्याने डावलल्यामुळे आणि मतदारांकडेही दुर्लक्ष केल्याने आपण पक्ष सोडला आहे, असे प्रत्युत्तर त्यांनी दिल्याने, सामोपचाराचे मार्ग बंद झाले
आहेत.
13 जिल्हय़ांमध्ये प्रभाव
सुवेंदु अधिकारी यांचा पश्चिम बंगाल राज्याच्या 13 जिल्हय़ांमध्ये प्रभाव असल्याचे दिसून येते. त्यांचे बंधू आणि पिता हे लोकसभेचे खासदार आहेत. तृणमूल काँगेस पक्षात ममता बॅनर्जी यांच्या खालोखाल महत्व असणारे नेते म्हणून ते प्रसिद्ध होते. ते भाजपमध्ये गेल्यास तृणमूलला फटका बसेल असे बोलले जाते.
प्रचाराचे रणशिंग फुंकले
विधानसभा निवडणूक येत्या मे महिन्यात होणार आहे. ती सत्ताधारी तृणमूल काँगेस आणि भाजप यांच्यासाठी अतिमहत्वाची ठरणार आहे. तसेच ती चुरशीची होईल अशी चिन्हे आतापासूनच दिसत आहेत. या निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग भाजप आणि तृणमूलने अनधिकृरित्या यापूर्वीच फुंकले आहे. राज्यात आता राजकीय वातावरण तापू लागले आहे.
तृणमूलचा धुव्वा उडणार!
आगामी काळात अनेक नेते तृणमूल काँगेस पक्षातून बाहेर पडणार आहेत. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाचा मोठा पराभव होणार आहे, असे भाकित भाजप नेते मुकुल रॉय यांनी केले आहे. रॉय हे स्वतः तृणमूलमधूनच भाजपमध्ये आले आहेत. ममता बॅनर्जी यांच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यांच्या पक्षाचे पतन निश्चित आहे, असे प्रतिपादन रॉय यांनी केले आहे.









