दोन महिन्यांपर्यंत अर्धा कि.मी.परिसरात जमावबंदी
प्रतिनिधी / बेळगाव
सुवर्ण विधानसौधच्या अर्धा कि.मी. परिसरात जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी हा आदेश जारी केला असून 24 जानेवारी 2021 च्या मध्यरात्रीपर्यंत तो लागू राहणार आहे.
वेगवेगळय़ा संघटनांच्यावतीने सुवर्ण विधानसौधवर मोर्चे काढून निदर्शने करण्यात येत आहेत. त्यामुळे हा आदेश जारी करण्यात आला आहे. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाला लागूनच सुवर्णविधानसौध आहे. मोर्चे, निदर्शने आदींमुळे महामार्गावरील वाहतुकीलाही अडथळे निर्माण होत आहेत.
सुवर्ण विधानसौधसमोर रास्ता रोको केल्यास रुग्णवाहिका जाणेही कठीण जाते. वेगवेगळय़ा इस्पितळात गंभीर आजारी किंवा अपघातात जखमी व्यक्तींना नेताना अडचणी निर्माण होतात. अत्यावश्यक सेवा पुरविणाऱया वाहनांचीही या मार्गावर वर्दळ असते. सध्या सुवर्ण विधानसौधमध्ये 24 सरकारी कार्यालये सुरू आहेत.
24 नोव्हेंबर 2020 पासून 24 जानेवारी 2021 च्या मध्यरात्रीपर्यंत सीआरपीसी कलम 144 अन्वये सुवर्ण विधानसौधच्या अर्धा कि.मी. परिसरात जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे सुवर्णसौधबाहेर मार्चे, आंदोलने, निदर्शने करता येणार नाहीत. अंत्ययात्रा, लग्न आणि धार्मिक कार्यक्रमांना हा आदेश लागू राहणार नाही, असे पोलीस आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.









