प्रतिनिधी / कोल्हापूर
खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिनी त्यांच्यावर राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला, क्रीडा यासह अन्य विविध क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. जन्मदिनी सकाळी त्यांनी करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी जनतेची सेवा करण्यासाठी बळ मिळू दे, अशी भावना देवीच्या चरणी व्यक्त केली. याप्रसंगी त्यांनी शिवशाहूंचा विचार लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कटीबद्ध आहे. आजपर्यंत सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. यापुढेही अशीच सेवेची संधी मिळू दे. शिवशाहूंनी हिंदवी स्वराज्य, बहूजन समाजाच्या उद्धारासाठी खर्ची घातलेल्या आयुष्याप्रमाणे एक टक्का जरी काम करु शकलो, तरी जीवनाचं सार्थक झालं म्हणता येईल, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.









