अर्ध्या मिनिटात दोन गुणांची पिछाडी भरुन काढत जेतेपदावर शिक्कामोर्तब
रोम / वृत्तसंस्था
शेवटचे 30 सेकंद बाकी…बजरंग पुनिया आपला मंगोलयिन प्रतिस्पर्ध्याविरुद्ध 0-2 फरकाने पिछाडीवर…निकाल जवळपास जणू ठरलेलाच होता…पण, त्याचवेळी बजरंगाच्या अंगात जणू वीरश्री संचारली आणि या 30 सेकंदात त्याने जोरदार मुसंडी मारत ऐतिहासिक सुवर्ण जिंकले….अन् नवा इतिहास रचला!
ऑलिम्पिक पदकाचा प्रबळ दावेदार असणारा भारतीय मल्ल बजरंग पुनियाने येथील मॅटेव पेलिकोन मानांकन स्पर्धेतील अंतिम फेरीत शेवटच्या 30 सेकंदात जोरदार मुसंडी मारली, त्यावेळी अवघ्या कुस्ती वर्तुळाने हा रोमांच अनुभवला.
मंगोलियाच्या तुल्गा तूमूर ओचिरविरुद्ध रंगलेल्या या लढतीत बजरंग पुनियाने अगदी शेवटच्या क्षणी निसटती बाजी मारली. 65 किलो वजनगटात अंतिम क्षणी बजरंग 0-2 असा पिछाडीवर होता. मात्र, यावेळी बरोबरी प्राप्त करण्यात त्याला यश मिळाले आणि पूर्ण वेळेनंतर बरोबरी असल्याने शेवटचा गुण ज्या मल्लाने घेतला, त्याला आणखी एक गुण बहाल केला जात असल्याने या नियमानुसार बजरंगला विजेता घोषित करण्यात आले.
कोव्हिड-19 च्या सक्तीच्या ब्रेकमुळे वर्षभर कुस्तीच्या स्पर्धाही होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे, साहजिकच बजरंग देखील कुस्तीच्या रिंगणापासून दूरच होता. पण, येथे त्याने पूर्वीच्या बहरात कुस्ती लढली आणि आपल्या फॉर्ममध्ये, तंदुरुस्तीत यत्किंचितही फरक पडला नसल्याचे दाखवून दिले. अर्थात, टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत खडतर आव्हान असल्याने आपल्याला आपल्या बचावावर अधिक मेहनत घ्यावी लागेल, हे त्याने येथे कबूल केले.
‘वर्षभराच्या सक्तीच्या ब्रेकनंतर रिंगणात उतरताना समाधान वेगळे होते. पूर्वीप्रमाणेच पायाचा बचाव भक्कम आहे, हे जाणवले. पण, मला स्वतःला यावर अधिक मेहनत घ्यायची आहे’, असे बजरंग सामन्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाला. अंतिम लढतीत जिंकणे कसे आव्हानात्मक होते, याचा त्याने येथे उल्लेख केला.
तो म्हणाला, ‘मुळातच, 65 किलोग्रॅम वजनगटात खूप पराकोटीची स्पर्धा असते. येथील फायनलमधील माझा मंगोलियन प्रतिस्पर्धी ओचिर यानेही टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली आहे. त्याला कमकुवत अजिबात मानता येणार नाही. या वजनगटातील जवळपास प्रत्येक प्रतिस्पर्धी टोकियो स्पर्धेच्या दिशेनेच तयारी करत आहे. त्यामुळे, कमालीची स्पर्धा आहे आणि आपला सर्वोत्तम खेळ साकारणे, ही एकच गुरुकिल्ली ठरते. खेळ कोणताही असो, त्यात हारजीत ओघानेच येते. येथे मी मॅटवर उतरुन जिंकू शकलो, याचा खास आनंद आहे’.
विदेशात प्रशिक्षणाचा मानस
या दमदार विजयानंतर बजरंग आता पुन्हा राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात दाखल होईल. मात्र, आशियाई चॅम्पियनशिपला सुरुवात होण्यापूर्वी बाहेर सराव करण्याचा त्याचा मानस आहे. आगामी आशियाई चॅम्पियनशिप कझाकस्तानमध्ये दि. 9 ते 11 एप्रिल या कालावधीत खेळवली जाणार आहे.
‘आशियाई चॅम्पियनशिपपूर्वी विदेशात सराव घेण्याचा माझा विचार आहे. सध्या युरोपमध्ये प्रवासावर अनेक बंधने आहेत आणि प्रवास करणे इतके सोपे राहिलेले नाही. अनेक फॉर्म भरावे लागतील, काही ऍप डाऊनलोड करावे लागतील. पण, तरीही अशा सराव शिबिराचे आयोजन करता येईल का, हे मी निश्चितपणे पाहीन’, असे बजरंग याप्रसंगी पुढे म्हणाला.
सुवर्ण जिंकले, तेथेच अव्वलस्थानही निश्चित झाले!
रोममध्ये संपन्न झालेल्या या कुस्ती स्पर्धेपूर्वी जागतिक कुस्ती मानांकन यादीत बजरंग दुसऱया स्थानी होता. आता 65 किलोग्रॅम वजनगटात 14 गुणांसह तो अव्वलस्थानी झेपावला आहे. ताजी मानांकन यादी रोममधील कुस्ती स्पर्धेच्या निकषावरच तयार केली गेली आहे. त्यामुळे, बजरंगने सुवर्ण जिंकले, त्याचवेळी मानांकन यादीतील त्याचे अव्वलस्थानही निश्चित झाले होते.
भारताची 2 सुवर्णपदकांसह 7 पदकांची कमाई
या वर्षातील पहिलीच मानांकन सिरीज असलेल्या या स्पर्धेत भारताने एकूण 7 पदकांची कमाई केली आहे. बजरंगसह विनेश फोगट सुवर्णपदकाची मानकरी ठरली तर सरिता मोरने 1 रौप्य जिंकत आणखी धवल यश प्राप्त केले. ग्रीको रोमन मल्ल नीरज (63 किलोग्रॅम), कुलदीप मलिक (72 किलोग्रॅम), नवीन (130 किलोग्रॅम वजनगट) यांनी तीन कांस्यपदके जिंकली.
विशालला कांस्य, नरसिंग यादवची मात्र निराशा
या स्पर्धेतील 70 किलोग्रॅम वजनगटात विशाल कालीरामनने कांस्यपदकाची कमाई केली. त्याने कझाकस्तानच्या सिरबाज तल्गतला 5-1 अशा एकतर्फी फरकाने नमवले. दरम्यान, अलीकडेच व्यावसायिक कुस्तीत पुनरागमन करणाऱया नरसिंग यादवला कांस्यपदकाच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागला. त्याला कझाकस्तानच्या डॅनियर कैसानोव्हने 5-0 अशा एकतर्फी फरकाने नमवले. नरसिंगने अलीकडेच 4 वर्षांचे निलंबन पूर्ण केले आहे.









