सहा जणांना अटक, तलवारी, जांबिया, चाकू जप्त
प्रतिनिधी/ बेळगाव
सुळेभावी येथील दुहेरी खून प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. वर्चस्व वादातून खुनाचा हा प्रकार घडल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. शुक्रवारी त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. चौकशी पूर्ण करून सर्व सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
शशिकांत भीमसी मिसाळे (वय 24, रा. कलमेश्वरनगर, सुळेभावी), यल्लेश सिद्राय हुंकरी-पाटील (वय 22, रा. कंबार गल्ली, सुळेभावी), संतोष यल्लाप्पा हणबरट्टी (वय 20, रा. बसवाण गल्ली, खणगाव बी. के.), देवाप्पा उर्फ देवभाय रवी कुकडोळी (वय 26, रा. लक्ष्मी गल्ली, सुळेभावी), मंजुनाथ शिवाजी परोजी (वय 22, रा. कलमेश्वरनगर, सुळेभावी), भरमाण्णा नागाप्पा नायक (वय 20, रा. खणगाव बी. के.) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव ग्रामीणचे एसीपी गिरीश, मारिहाळाचे पोलीस निरीक्षक महांतेश बस्सापूर, हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक विजयकुमार सिन्नूर व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व सहा जणांची कसून चौकशी करण्यात आली आहे. त्यांनी खुनाची कबुली दिल्याने त्यांना अटक केल्याचे पोलीस अधिकाऱयांनी सांगितले.
गुरुवार दि. 6 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजता रणधीर उर्फ महेश रामचंद्र मुरारी (वय 26), प्रकाश निंगाप्पा हुंकरी-पाटील (वय 24, दोघेही रा. सुळेभावी) यांचा भीषण खून करण्यात आला होता. खुनानंतर मारेकऱयांनी पलायन केले होते. पोलिसांनी दोन दिवसांत सहा जणांना अटक केली आहे. त्यांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी तृतीय न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खून झालेला रणधीर उर्फ महेश मुरारी व शशिकांत मिसाळे यांच्यात वर्चस्व वादातून संघर्ष सुरू होता. या संघर्षातून अधूनमधून उभय गटांत भांडणे व्हायची. गुरुवारी रात्री तलवारी, जांबिया, लांग, चाकूने हल्ला करून या दोघा जणांचा काटा काढण्यात आला आहे. खुनासाठी वापरण्यात आलेली शस्त्रs पोलिसांनी जप्त केली आहेत.









