प्रतिनिधी / अक्कलकोट
अक्कलकोट तालुक्यातील सुलेरजवळगे येथील एका पंचवीस वर्षाच्या कर्णबधीर अविवाहित तरुणास कोणत्यातरी अज्ञात रेल्वेने धडक दिल्याने जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी ( दि. ५) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली.
रमेश बसवराज शिरगुरे ( वय २५, रा. सुलेरजवळगे ) असे ठार झालेल्या तरुणाचे नांव आहे. सुलेरजवळगे लगत असलेल्या रेल्वे रुळावर त्याचा मृतदेह आढळला. त्यानी नेहमीप्रमाणे सकाळी प्रांतविधीसाठी रेल्वेच्या तडवळ रस्तावरुन गेले होते. उशिरापर्यंत ते घरी परतले नसल्यामुळे भावानी शोधाशोध सुरु केली.
सोलापूर ते तडवळ रेल्वे मार्गावरील सुलेरजवळगे गावालगत असलेल्या रेल्वे रुळाजवळून प्रांतविधीसाठी जात असताना कोणत्यातरी अज्ञात रेल्वेने जोरदार धडक दिल्याने तो जागीच मयत झाला आहे. या रेल्वे दगड २७१/४ जवळ मृतदेह सापडला.संबंधित मृतदेह हा रमेश शिरगुरे यांचा असल्याची भावानी खात्री केली. त्यानंतर पोलीस पाटील संजय कोळी यांनी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणेस सांगितले.या घटनेची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.पोलीसांनी पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतले. याबाबतची खबर मयताचे भाऊ महेश शिरगुरे यांनी दिला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप काळे हे अधिक तपास करत आहेत.









