प्रतिनिधी/ सातारा
शिरवळ (ता. खंडाळा) येथील बसस्थानकातील सुलभ शौचालयामध्ये अज्ञात कारणावरुन सुलभ शौचालय चालकाचा गळा आवळून डोके आपटत खून करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये रणजित गणपतराव जाधव (वय 40, रा. बौध्द आळी, शिरवळ ता. खंडाळा) असे खून झालेल्या सुलभ शौचालय चालकाचे नाव आहे.
याबाबतची घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, शिरवळ (ता. खंडाळा) येथील रणजित जाधव यांनी एसटी स्टँडमध्ये असणाऱया सुलभ शौचालय चालविण्याकरिता घेतले आहे. दरम्यान, दि. 19 रोजी नेहमीप्रमाणे रणजित जाधव हा सुलभ शौचालय याठिकाणी उपस्थित असताना अज्ञात दोघांबरोबर अज्ञात कारणावरुन रणजित जाधव यांची वादावादी झाली. यावेळी झालेल्या वादावादीमध्ये संबंधितांनी रणजित जाधव यांचा गळा आवळत डोके आपटल्याने रणजित जाधव जागीच ठार झाला. सदर घटना सकाळी उघडकीस येताच शिरवळ परिसरात खळबळ उडाली. यावेळी घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केल्याने मोठय़ा प्रमाणात खळबळ उडाली.
यावेळी घटनास्थळी शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश इंगळे, पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई, सागर अरगडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, घटनास्थळी सातारा येथील रिओ श्वानाला व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले होते. यावेळी एका संशयिताला शिरवळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक महेश इंगळे हे करीत आहे.









