रंगतदार लढतीमुळे कुस्तीशौकीन खुश
वार्ताहर/ औंध
देशातील तुफानी ताकदीचा अव्वल मल्ल जस्सा पट्टीच्या आक्रमणापुढे भारत केसरी सुदेशकुमारचा बचाव अपयशी ठरला. दहाव्या मिनिटाला जस्साने ‘पुट्टी’ डावावर सुदेशकुमारला आस्मान दाखवून सुर्लीचे कुस्ती मैदान मारले. छोटय़ा गटातील चुरशीच्या लढतीने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फिटले.
सुर्ली (ता. कराड) येथील पिराच्या यात्रेनिमित्त कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम क्रमांकाची कुस्ती जस्सा पट्टी विरुद्ध सुदेशकुमार अशी लावण्यात आली. यावेळी खा. श्रीनिवास पाटील, माजी आ. आनंदराव पाटील, वैभव देसाई, अमोल डांगे, कमलाकर चौगुले, धनाजीकाका पाटील, शिवाजीराव सर्वगोड, धनाजी शिंदे, राजू जाधव, महेश भोसले, हिंदकेसरी संतोष वेताळ, नवनाथ पाटील, सरपंच दत्तात्रय वेताळ, आशुतोष पाटील, अमोल भोगे, प्रविण वेताळ, मनोज माने, निसार मुल्ला, संभाजी माने, भिमराव माने, कृष्णत मदने, सुर्यकांत जाधव, सचिन मदने, यांची प्रमुख उपस्थिती होती.
जस्साने सलामीलाच समोरुन चाट मारीत आपले इरादे स्पष्ट केले होते. भक्कम बचाव करून सुदेशकुमारने जस्साचे प्रयत्न हाणून पाडले मात्र बगलडूब करून कब्ब्जा घेतलेल्या जस्साची डोळ्याचे पारणे फेडणारी ‘पुट्टी’ रोखण्याचा सुदेशचा प्रयत्न फसल्याने त्याला पराभवाची धूळ पचवावी लागली. सैदापूरच्या रणजित राजमाने याने सयाजी जाधवला पराभूत केले. कोपर्डेच्या गौरव हजारे पुढे दिल्लीच्या मल्लाची डाळ शिजली नाही. सुषांत माने याने नितीन मानेवर चुरशीच्या लढतीत मात केली. बाबू सर्वगोड समीर पटेलला भारी ठरला. सिध्देश साळुंखे विरुद्ध भालत पवार ही कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली.
तसेच यावेळी खली मुल्ला (वाघेरी), साहिल चव्हाण, रोहित भोसले (कडेगाव), विश्वजीत बानगे (कडेगाव), विक्रम माने (सुर्ली), करण भोसले कोल्हापूर, प्रणव पाटील, सुशांत टेंगरे, शिवम डोंब, अथर्व वेताळ, आर्यन भोगे, इंझमाम पटेल, आदित्य फडतरे (सैदापूर) यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी मल्लावर प्रेक्षणीय विजय मिळवून उपस्थितंची वाहवा मिळवली. रामदास गायकवाड, यांनी मैदानाचे समालोचन केले.
खासदारांनी बांधला अंजलीला स्वतःचा फेटा
सुर्लीची कन्या अंजली वेताळ विरुद्ध संतोष जाधव मसूर यांच्यातील अटीतटीची लढत चांगलीच रंगली. मात्र निर्णायक क्षणी अंजलीने समोरून झोळी बांधून संतोषला पराभवाची धूळ चारली. मुलाबरोबर लढताना रणरागिणी अंजलीने दाखवलेली जिगर आणि जिद्द पाहून भारावलेल्या खा. श्रीनिवास पाटील यांनी स्वताःच्या डोक्यावरील फेटा अंजलीला बांधून तीच्या लढाऊ वृत्तीचे कौतुक करून तिच्या खेळाला दाद दिली.
सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनाचा मान महिलांना
सुर्ली गावात ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गावच्या इतिहासात प्रथमच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनाचा मान गावातील महिलांना देऊन ग्रामस्थांनी नारीशक्तीच्या केलेल्या गौरवाची चर्चा गावात सुरू होती.








