अवकाळी पावसाचा व वादळाचा शेतकऱयांना फटका
प्रतिनिधी/ पणजी
सांखळी मतदारसंघातील सुर्ल-जोशीभाट या गावात यंदा प्रथमच सामुहिक शेती करण्याचा निर्णय घेऊन जोशीभाट येथील शेतकऱयांनी गेली वीस वर्षे पडीक असलेल्या शेतजमिनीत प्रचंड मेहनत घेऊन केलेल्या हळसाणा पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. सुर्ल-जोशीभाट येथील 40 शेतकऱयांनी पडीक असलेल्या जमिनीत प्रथमच हळसाणा पिकाची लागवड केली होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अटलग्राम योजनेतर्फे शेतकऱयांकडून संपूर्ण जमीन साफ करून घेतली होती. यासाठी अटलग्रामचे सुभाष वेळीप, विजय सक्सेना, मयुरेश शेटय़े, जि. प. सदस्य गोपाळ सुर्लकर, सरपंच चंद्रकांत घाडी, पंच सुभाष फोंडेकर व संपूर्ण पंचायत मंडळ यांचे बहुमोल मार्गदर्शन व साहाय्य या कामी लाभले होते. बियाणेसुद्धा अटलग्राम योजनेतर्फे मोफत दिले होते. अर्धे पीक हाती लागते न लागते तोच प्रचंड पावसामुळे हळसाणाची शेती पाण्याखाली जाऊन शेंगा कुजून गेल्या.
तसेच सुर्ल परिसरातील बागायतीतील माड, पोफळी, केळी व इतर झाडे वादळीवाऱयामुळे जमीनदोस्त होऊन शेतकऱयांचे फार नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच सांखळी कृषी विभागीय अधिकारी निलिमा गावस, गोविंद परब व सुरेंद्र बेतकीकर यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली व बागायतदारांना नुकसानभरपाईसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले, असे कडचाळे किसान संघाचे अध्यक्ष व जोशीभाट-सुर्ल शेतकरी संघटनेचे सचिव विष्णू ऊर्फ बाबलो नाटेकर यांनी सांगितले.s









