वृत्तसंस्था/ चंदिगड
दरोडेखोरांच्या हल्ल्यात क्रिकेटपटू सुरेश रैना यांच्या काकांचा मृत्यू झाला. तर महिलांसह चौघे जण जखमी झाले आहेत. पंजाब येथील पठाणकोट जिह्यात ही घटना घडली. पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिली. सुरेश रैना शनिवारी दुबईतून भारताकडे रवाना झाल्याचे सांगितले आहे. वैयक्तिक कारणासाठी तो आयपीएलमध्ये सहभाग घेणार नसल्याचे सुपरकिंग्ज संघाने सांगितले आहे. सुरेश रैनाचा भाऊ दिनेशने दरोडखोरांचा दहा दिवसानंतरही येथील पोलिसांना तपास लागला नसल्याचे प्रसार माध्यमांना सांगितले आहे.
पंजाब येथील पठाणकोट जिह्यात थारियाल गाव आहे. येथे सुरेश रैनाचे नातेवाईक राहतात. 19 ते 20 ऑगस्टदरम्यान अशोक कुमार यांच्या घरी दरोडा पडला. काले कच्छेवाला टोळीने हा दरोडा टाकला असल्याचे समजते. अशोककुमार हे सरकारी ठेकेदार होते. अशोक कुमार यांचे भाऊ शामलाल यांनी ते सुरेश रैनाचे काका असल्याचे सांगितले आहे. दरोडय़ासाठी आलेल्या चौघांनी टेरेसवर झोपलेल्या कुटुंबीयांवर हल्ला करुन लूट केली. या हल्ल्यात अशोक कुमार यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच त्यांची पत्नी, आई व मुले जखमी झाले. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सुरेश रैना भेट देईल अशी त्यांनी पोलिसांकडे अपेक्षा व्यक्त होती. दहा दिवसानंतरही पोलीस दरोडखोरांचा तपास लावू शकले नाही. तसेच हे क्रिकेटपटू सुरेश रैनाचे नातेवाईक असल्याने त्यांच्यासमोर आव्हान निर्माण झाले आहे.









