भाजपच्या मंगला अंगडी यांना विजयी करण्याचे आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी सोमवारी बेळगाव न्यायालयामध्ये भाजपचा प्रचार केला. भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी यांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी यावेळी वकिलांना केले आहे. दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांनी बेळगावच्या विकासासाठी केलेले कार्य उल्लेखनिय आहे. त्यांची अनेक कामे अर्धवट आहेत. ती पूर्ण करण्यासाठी मंगला अंगडी यांना विजयी करावे, अशी विनंती त्यांनी वकिलांना केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासासाठी जो प्रयत्न केला आहे तो संपूर्ण जगाने पाहिला आहे. स्वच्छ आणि सुंदर भारत बनविणे ही त्यांची संकल्पना आहे. त्यामुळे त्यांना बळकटी देणे महत्त्वाचे असून या पोटनिवडणुकीत मंगला अंगडी यांना विजयी करून त्यांना लोकसभेत पाठवा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
बेळगाव शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश करण्यात आला आहे. केवळ बेळगावच नाही तर हुबळी-धारवाड यासह उत्तर कर्नाटकामध्ये रेल्वेचा विस्तार आणि विकास करण्यासाठी दिवंगत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी नेहमीच पाठपुरावा केला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे. बेळगाव-धारवाड रेल्वेमार्गासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. त्याला मंजुरी मिळाली असून ते काम पूर्ण करण्यासाठी भाजपलाच विजयी करणे महत्त्वाचे आहे. तेव्हा प्रत्येकाने भाजपच्या पाठिशी ठामपणे राहावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
या प्रचारावेळी त्यांच्या सोबत बार असोसिएशनचे उपाध्यक्ष गजानन पाटील, जनरल सेपेटरी आर. सी. पाटील, जॉईंट सेपेटरी शिवपुत्र फटकळ, ऍड. रमेश देशपांडे, ऍड. आर. एस. मुतालिक, ऍड. सचिन शिवण्णावर, ऍड. सदाशिव हिरेमठ, ऍड. बसवराज ओसी यांच्यासह वकील उपस्थित होते.









