मगो पक्षाचे खंदे कार्यकर्ते, नेते, मंत्री म्हणून स्वच्छ कारकीर्द : गोवा विधानसभेचे सभापती म्हणून दमदार, प्रभावी भूमिका,पत्रकारिता, साहित्याच्या क्षेत्रातही लक्षणीय योगदान
प्रतिनिधी / पणजी
गोव्याचे माजी विधानसभा सभापती तथा माजी शिक्षणमंत्री व चारवेळा मगो पक्षाच्या उमेदवारीवर म्हापसा मतदारसंघात विजयी झालेले प्रा. सुरेंद्र वसंत सिरसाट यांचे अल्प आजाराने काल सोमवारी रात्री 10 वा. 10 मिनिटांनी म्हापसा येथील एका खासगी इस्पितळात निधन झाले.
गेले दोन दिवस सिरसाट हे गंभीर आजारी होते. त्यांचे मूत्रपिंड तसेच अन्य अवयव निकामी झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक पुत्र, एक कन्या असा परिवार आहे. अंत्यसंस्कार आज दुपारी 12 वाजता म्हापसा येथील शांतीवन स्मशानभूमीत करण्यात येतील.
मगो पक्षाचे खंदे कार्यकर्ते, नेते
सिरसाट हे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे माजी अध्यक्ष होते. मगो पक्षासाठी ऍड. रमाकांत खलप यांच्या बरोबरीने त्यांनी गावागावात जाऊन काम केले होते. राजकारणात 25 ते 30 वर्षे होते. परंतु आमदार असताना कधीही मगो पक्षाचा त्यांनी त्याग केला नाही. पक्षाशी एकनिष्ठ राहिले.
1977 मध्ये त्यांना म्हापसा मतदारसंघात मगो पक्षाची उमेदवारी देण्यात आली व ते विजयी ठरले. त्यानंतर 1984 मध्ये त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली. त्यातही ते बहुमताने विजयी झाले. 1989 च्या निवडणुकीनंतर मगो पक्ष फुटीर काँग्रेस आमदारांच्या मदतीने सत्तेवर आला असता 1990 मध्ये ते सभापती बनले. त्यानंतर 1998 मध्ये ते डॉ. विल्प्रेड डिसोझा यांच्या नेतृत्त्वाखाली आलेल्या गोवा राजीव काँग्रेस, मगो, भाजप या आघाडीच्या सरकारमध्ये शिक्षणमंत्री होते.
सभापती म्हणून कारकीर्द गाजली
1990 मध्ये त्यांची गोवा विधानसभेच्या सभापतीपदी एकमताने निवड करण्यात आली. त्याचदरम्यान 1991 मध्ये मगो पक्षात फूट पडली. त्यावेळी फुटीर गटाला तत्कालीन मुख्यमंत्री रवी नाईक यांच्यासह त्यांच्या अन्य सात आमदारांना त्यांनी अपात्र ठरविले होते. सुरेंद्र सिरसाट यांना त्यावेळी सत्ताधारी काँग्रेस पक्षाने असंख्य आमिषे दाखविली, आमदारांना अपात्र करण्यात येऊ नये यासाठी त्यांच्यासमोर त्यांना दहा लाख व अन्य काही वस्तू देऊन मंडळी रात्रीच्यावेळी दारात उभी राहिली. परंतु स्वतः अत्यंत प्रामाणिक असलेल्या सिरसाट यांनी कोणत्याच आमिषाला बळी न पडता कायदय़ानुसार संबंधितांना अपात्र ठरविले. त्यांनी त्यावेळी दिलेला निवाडा हा पुढील सभापतींनी बदलला, परंतु मुंबई उच्च न्यायालयाने सिरसाट यांचा निवाडा उचलून धरला. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयानेदेखील सिरसाट यांच्या निवाडय़ावर 1994 मध्ये शिक्कामोर्तब केले होते.
प्रा. सुरेंद्र सिरसाट हे असंख्य सामाजिक संस्थांशी संबंधित होते. गोमंतक साहित्य सेवक मंडळ, बार्देश बझार, म्हापसा अर्बन बँकेचे काही वर्षे संचालक, म्हापसा वैश्य मंडळ असे गोव्यातील अनेक संस्थांशी त्यांचा संबंध होता व त्यांनी त्यासाठी कार्यही केले होते. 1986-87 मध्ये राज्यात मराठी, कोकणी भाषिक वाद उफाळून आला होता. त्यावेळी मराठीसाठी झालेल्या आंदोलनात सिरसाट यांनी हिरीरिने भाग घेतला. तसेच गोमंतक मराठी अकादमी स्थापण्यासाठी ते ऍड. रमाकांत खलप यांच्याबरोबर अनेक ठिकाणी झोळी घेऊन फिरले होते.
प्राध्यापक, पत्रकार, व्यासंगी लेखक
प्रा. सुरेंद्र सिरसाट यांनी कैक वर्षे म्हापसा येथील ज्ञानप्रसारक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य म्हणून अनेक वर्षे सेवा बजावली होती. सभापतीपद गेल्यानंतर ते पुन्हा उच्च माध्यमिक विद्यालयात परतले. तत्पूर्वी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांचा सर्वत्र संचार होता. मगो पक्षाचे ते कित्येक वर्षापासून सदस्य म्हणून काम करीत होते. तसेच म्हापसा येथून एका वृत्तपत्रासाठी बातमीदार म्हणून देखील अनेक वर्षे काम करीत होते. एक व्यासंगी लेखक, अभ्यासक तसेच नाटय़प्रेमी आणि अनेक नाटकांमध्ये भूमिका बजावून आपल्या कलेचे दर्शन त्यांनी जनतेला घडविले. म्हापसा येथील ज्ञानप्रसारक मंडळाचे ते काही वर्षे अध्यक्षही होते. त्यांना पुस्तकांची भारी आवड होती व ते स्वतः एक चांगले लेखक बनले व त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. याशिवाय दै. तरुण भारतसह अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन चालू असायचे.
ऍड. रमाकांत खलप यांना दुःख
माजी केंद्रीय कायदामंत्री तसेच माजी उपमुख्यमंत्री ऍड. रमाकांत खलप यांनी सुरेंद्र सिरसाट यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. आपण एका सच्च्या मित्राला मुकलो, आपल्या बरोबरीने अनेक वर्षे मगो पक्षात राहून या राज्याची सेवा बजावली होती. तसेच सभापतीपदी राहून निःपक्षपातीपणाची भूमिका बजाविलेले सिरसाट हे एक उत्तम व अत्यंत व्यासंगी व्यक्तिमत्त्व होते व अत्यंत प्रामाणिकपणे त्यांनी म्हापसा मतदारसंघ व पर्यायाने गोव्याची सेवा बजावली होती, असे ते पुढे म्हणाले.









