मज्जासंस्थेचे दोषावर उपचार व वेदना कमी करण्यासाठी बनविले उपकरण
संजय खूळ / इचलकरंजी
शालेय शिक्षण घेत असतानाच आपण वेगळे काही तरी संशोधन करण्याची तिची प्रबळ इच्छा होती अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन उच्च शिक्षणासाठी ती अमेरिकेला गेली आणि चक्क मेंदूमध्ये बसवण्याचे प्रॉमिस तिने तयार केले या माध्यमातून आता मेंदूकडे जाणाऱ्या मज्जासंस्थेच्या दोषावर उपचार करणे त्याच बरोबर त्याच्या वेदना कमी करणे सहज शक्य होणार आहे. येथील सुरभी राजेंद्र निंबाळकर हिने मेडिकल इंजिनिअरिंग क्षेत्रात केलेले हे महत्त्वपूर्ण संशोधन जगभरातील सुमारे शंभर कोटी व्याधी ग्रस्ताना एक वरदान ठरणार आहे.
संशोधन क्षेत्रात काम करीत इचलकरंजीतील युवक-युवतींनी जगभरात आपली छाप पाडली आहे. सुट्टीच्या या नव्या संशोधनाने इचलकरंजीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सुरभीने बायो-मेडिकल इंजिनीअरिंग क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे संशोधन करत ग्राफिन पासून मेंदूमध्ये बसविण्या करीता इम्प्लंट बनविण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्याच्या चाचण्याही यशस्वी झाल्या आहेत. भविष्यात मज्जासंस्थेच्या दोषांच्या उपचारांपासून ते वेदना कमी करण्यापर्यंतच्या उपचारांसाठी यांचा प्रभावी वापर होणार आहे.
शालेय शिक्षण घेतानाच आपण संशोधन करायची ही तिची वृत्ती होती. डी के टी संस्थेच्या अनंतराव भिडे प्राथमिक विद्यामंदिर व इचलकरंजी हायस्कूल या ठिकाणी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुरभी बारावी शास्त्र शिक्षण गोविंदराव ज्युनिअर मद्ये घेतले. अभियांत्रिकीचे वेगळ क्षेत्र निवडत तिने बी ई ( इन्स्ट्रमेंटेशन) ही पदवी उच्च गुणवत्तेसह प्राप्त केली. कमिन्स इंडिया येथे दोन वर्षे कार्यानुभव मिळवल्यानंतर तिने उच्च शिक्षणाकरिता अमेरिकेत कॅलिफोर्निया राज्यातील सॅन-डिएगो स्टेट युनिव्हर्सटी येथे प्रवेश घेऊन एम एस ही पदवी मिळविली.
मानवी मेंदू आणि कॉम्प्युटर यांचा एकमेकांशी संवाद साधण्याकरिता इंटरफेस तयार करण्यासाठी अमेरिकेत स्थापन झालेल्या ग्राफ़ेटॉण या स्टार्ट अप कंपनी मध्ये सुरभि वरिष्ट अभियंता म्हणून तिने काम करताना एक महत्त्वपूर्ण संशोधन केले. यावेळी तिने मेंदूमध्ये वापरणारे एक मायक्रो चिप्स (प्रोब्स) तयार केली. प्रोब्स मेंदूमध्ये उत्पन्न होणारे विद्युत संदेश ग्रहण करण्यास तसेच मेंदूपर्यंत पोहोचवण्यासही सक्षम आहेत. भविष्यात मज्जासंस्थेच्या दोषांच्या उपचारांपासून ते वेदना कमी करण्यापर्यंतच्या उपचारांसाठी यांचा प्रभावी वापर होऊ शकणार आहे.
मज्जासंस्था वरील उपचाराला वरदान
पार्किन्सन, स्ट्रोक, एपिलेप्सी, कंपवात, इत्यादी सारख्या न्यूरोलॉजिकल विकारांनी जगभरातील जवळजवळ १०० कोटी व्यक्ती ग्रस्त आहेत. त्यांच्याकरता हे नाविन्यपूर्ण प्रोब्स व ब्रेन-कॉम्प्युटर इंटरफेसेस महत्वाचे ठरणार आहेत. सुरभिच्या संशोधना मुळे महत्त्वाची उपचार पद्धती तसेच संशोधनाच्या संधीही उपलब्ध होत आहेत. नव्याने विकसित केलेले कार्बन-आधारित न्यूरल-प्रोब मेंदूत इम्प्लांट करण्यायोग्य आहेत. हे मायक्रोइलेक्ट्रोड्स पारंपारिक सोन्याच्या प्लॅटिनम,इरिडियमच्या इलेक्ट्रोड्सपेक्षा अधिक उपयुक्त आहेत. त्यांचे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रोकेमिकल गुणधर्मही खूप चांगले दिसत आहेत आणि हे प्रोब्स मेंदूमध्ये बसवण्यात अनेक फायदे मिळणार आहेत. लहानपणापासून अत्यंत जिद्दी आणि संशोधक वृत्ती तिची होती. यापुढील काळातही ती सातत्याने संशोधना मध्येच काम करणार आहे. तिने केलेले हे संशोधन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
– राजेंद्र निंबाळकर








