कोरोनाची महामारी रोखण्यासाठी माजी सैनिक सरसावला
बोरगाव/प्रतिनिधी
कोरोना महामारीच्या संकटापासून जनता सुरक्षित राहावी म्हणून आरोग्य सेवा, प्रशासन, पोलीस अहोरात्र झटत आहेत त्यांच्यावरील दिवसेंदिवस वाढणारा ताण कमी करून सहकार्याच्या भावनेतून माजी सैनिक रस्त्यावर उतरले आहेत.
अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली गावामध्ये दिवसेंदिवस मोकाट फिरणारी तरूणाई, मोटार सायकल स्वार, वाहने त्याचबरोबर लगतची शहरे, गाव यातून बाहेर येणाऱ्या जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे म्हणून याला आळा बसावा यासाठी अनेक गावांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला बोरगावने ही तीन दिवस जनता कर्फ्यू लागू करून गावाच्या आरोग्याची काळजी घेतली. या काळात ग्रामपंचायतीने मदतीसाठी माजी सैनिकांना आव्हान केले या आव्हानाला माजी सैनिकांनी तात्काळ होकार देत गावाच्या आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकून गावात शांतता, आरोग्य आणि प्रशासनाच्या सूचना ग्रामस्थांनी तंतोतंत पाळाव्या यासाठी आक्रमक भूमिका घेतली. या माजी सैनिकांनी गावात फिरून चौका-चौकात उभे राहून घरीच रहा, काळजी घ्या, घाबरु नका, मास्कचा वापर करा. गावाच्या आरोग्यासाठी आणि आप-आपल्या कुटुंबाच्या हितासाठी प्रशासनावर कायदेशीर कारवाईची वेळ येऊ देऊ नका असे कळकळीचे आव्हान केले.
ऐन उमेदीचा काळ देश सेवेसाठी घालवनाऱ्या या माजी सैनिकांनी नैसर्गिक आपत्तीच्या काळात ही समाजापुढे येऊन गावाप्रती असलेली सामाजिक बांधिलकी जपली आहे. स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास असणाऱ्या आणि पुरोगामी विचारांच्या गावाने माजी सैनिकांच्या कामाचे कौतुक केले आहे.








