आठ हजार रुपयांसह चाव्यांची पिशवी केली परत
वार्ताहर / वेंगुर्ले:
वेंगुर्ले शहरातील दाभोली येथील रस्त्यात सापडलेली पैशांची पिशवी दोन दिवसांच्या शोधकार्यानंतर मानसपूल येथील मत्स्यविक्री करणाऱया महिलेकडे सुपूर्द करत सुमो चालक जेम्स डिसोजा यांनी प्रामाणिकपणा दाखविला.
शहरातील दाभोली नाका परिसरात असलेल्या सुमो स्टँडसमोर सुमो व्यावसायिक जेम्स डिसोजा यांना पिशवी पडलेली दिसली. त्या पिशवीत आठ हजार रुपये, बॅगेच्या चाव्यांसह मासे विक्रीसाठी दिलेला बिल्ला होता. मात्र, त्यात ओळख पटण्यासारखा कोणता पुरावा नसल्याने व्हॉट्सऍप व फेसबुकवरून त्यांनी माहिती दिली. तरीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पिशवीत सापडलेल्या बिल्ल्यानुसार मत्स्यविक्री करणाऱया महिलांना विचारणा केली असता सदरची पिशवी ही उभादांडा केपादेवी मंदिरनजीक राहणाऱया महानंदा सज्जन गिरप यांची असल्याचे समजले. त्यानुसार गिरप यांनी बुधवारी सुमो स्टँडवर पिशवी आपलीच असल्याची खातरजमा केली. त्यानंतर डिसोजा यांनी सदर पिशवी गिरप यांच्या स्वाधीन केली. गिरप यांनी डिसोजा यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. यावेळी संजय भाटकर, गिरगोल
फर्नांडिस, चंद्रशेखर तोरसकर, अमित म्हापणकर, सुशिल बांदेकर आदी सुमो व्यावसायिक उपस्थित होते. a









