सणवारी गोडधोड हवंच. श्रीखंड, गुलाबजाम,रसगुल्ले अशा नेहमीच्या पदार्थांपेक्षा काहीतरी वेगळं करून बघावं, असं प्रत्येकीच्या मनात येतं. नेहमीच्या पदाथ ाऊंना थोडं ट्विस्ट देता येतं. आज हरेक गोडाधोडाचे पदार्थ बाजारात मिळत असले तरी घरी बनवलेल्या पदार्थांपासून मिळणारं समाधान वेगळंच असतं. गणपती, अधिक मास, नवरात्र, दिवाळीला महिला छान छान पदार्थ करतात. त्यातच या काळात पक्वान्नांना विशेष मागणी असते. मुलंही गोड खाण्याचा हट्ट धरतात. वेगळं पक्वान्न म्हणून बासुंदी करता येईल. वासुंदी सगळ्यांना आवडते.तसंच वेगवेगळे फ्लेवर्स मिसळता येत असल्यानं बासुंदीची लज्जत अधिकच वाढते. पारंपरिक प्रकाराने केलेली बासुंदी आपण नेहमीच खातो पण फळांच्या चवींमध्ये बासुंदीची चव चाखता आली तर ! ऑरेंज बासुंदी हा घरच्या घरी करता येणारा प्रकार असल्यानं संत्र्याच्या स्वादाची ही डिश सगळ्यांना आवडेल यात शंका नाही!
साहित्य – भरपूर फॅट असलेलं एक किंवा अर्धा लीटर दूध, तीन चतुर्थांश कप साखर, बदाम आणि पिस्त्याचे तुकडे (सजावटीसाठी), अर्धा टी स्पून वेलची पावडर, थोडंसं केशर.
कृती- एका पसरट भांडय़ामध्ये दूध काढून घ्या. मंद आचेवर गरम करायला ठेवा. दुधाची मात्रा सध्याच्या प्रमाणाच्या अर्धी होईपर्यंत ढवळत रहा. हे दूध मंद आचेवर निम्म्यापर्यंत आटवा. दुधामध्ये साखर घाला. हे मिश्रण थोडं घट्ट होईपर्यंत ढवळत रहा. थोडंसं घट्ट झाल्यावर मिश्रणामध्ये वेलची पावडर घालून वीस मिनिटं आटवा. यावेळी केशरही घाला. मिश्रण थंड झाल्यानंतर त्यात अर्धा कप संत्र्याचा गर घाला. ताजी संत्री नसल्यास ऑरेंज स्क्वॅशचा वापर करूनही ऑरेंज बासुंदीची चव चाखता येईल. यानंतर बदाम आणि पिस्त्यांनी सजावट करुन सर्व्ह करा. या ऑरेंज बासुंदीचं नक्कीच कौतुक होईल आणि तुम्हालाही काहीतरी वेगळं केल्याचं समाधान मिळेल.









