शिरोडय़ातून दहाव्यांदा निवडणूक लढणार
प्रतिनिधी /फोंडा
शिरोडा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार व माजी मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सोमवारी शिरोडय़ातून उमेदवारी अर्ज दाखल केला. शिरोडकर हे यंदा दहाव्या वेळी शिरोडय़ातून विधानसभा निवडणूक लढवित आहेत. कार्यकर्त्यांवर आपला पूर्ण विश्वास असून त्यांच्या पाठिंब्यावर मोठय़ा मताधिक्याने विजयी होण्याचा दावा यावेळी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना त्यांनी केला.
भाजपाचे गोवा प्रदेश सरचिटणीस ऍड. नरेंद्र सावईकर, शिरोडा जि. पं. सदस्य नारायण कामत, शिरोडा भाजपाचे अध्यक्ष सूरज नाईक तसेच विविध पंचायतींचे सरपंच, पंचसदस्य व भाजपा कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. कार्यकर्ता हीच आपली खरी ताकद असून त्यांना नेहमीच जिंकण्याची हौस असते. हा उत्साहच आपल्या विजयाची खात्री आहे असे त्यांनी नमूद केले. शिरोडय़ातील नियोजनबद्ध विकास आपल्याला अपेक्षित आहे. येणाऱया काळात पुन्हा भाजपाचेच सरकार सत्तेवर येणार व त्यावेळी शिरोडा विकासाच्या आघाडीवर असणार असे ते म्हणाले. पोटनिवडणूकीत निसटता विजय मिळण्यामागील कारण विचारले असता, त्यावेळी मगो व भाजप अशी थेट लढत होती. मगोचे अध्यक्षच आपले प्रतिस्पर्धी होते व त्यांचे बंधू मंत्रीमंडळात होते. त्याचा प्रभाव या निवडणुकीवर होता. त्यांना मंत्रीमंडळातून हटविताच शिरोडय़ात बदल झाला. यावेळी अशी परिस्थिती नाही. आपल्याला मोठय़ा मताधिक्याने विजयी होण्याची पूर्ण खात्री असल्याचे शिरोडकर यांनी सांगितले.









