प्रतिनिधी / मिरज
मिरज तालुक्यातील सुभाषनगर येथे क्रेनची धडक बसून हैबती तयाप्पा जाधव (वय 70) ही वृद्धा जागीच ठार झाली. सुभाषनगरच्या हद्दीत टाकळी रस्त्यावर सोमवारी सकाळी हा अपघात झाला. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात नोंद आहे. पोलिसांनी क्रेन चालक सिराज अन्सारी (रा. बिहार) याला ताब्यात घेतले आहे.
रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी तासगाव फाट्यावरून टाकळीकडे एम एच -10-डी जी-9270 हा क्रेन निघाला होता. सदर क्रेन सुभाषनगर येथे आला असता रस्त्यावरून चालत जात असलेल्या हैबती जाधव यांना धडक बसली. या अपघातात जाधव या क्रेनच्या चाकाखाली जाऊन चिरडल्या. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. क्रेन चालक सिराज अन्सारी यास ताब्यात घेतले आहे.








