सांगली : अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेल्या ‘महाराष्ट्र फाउंडेशन’ (अमेरिका) या संस्थेच्या वतीने दरवर्षी साहित्य व समाजकार्य पुरस्कार दिले जातात. २०२० या वर्षाचा वाङमय पुरस्कार विज्ञान कथा या वाङमय प्रकारासाठी, ख्यातनाम विज्ञानकथा लेखक सुबोध प्रभाकर जावडेकर यांना देण्यात आला.
जावडेकर मूळचे इस्लामपूर येथील आहेत. एक लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. जावडेकर यांनी सोळा पुस्तके लिहिली असून गुगली, वाचनाचे चवथे पाऊल, संगणकाची सावली, कुरुक्षेत्र, मेंदूच्या मनात, आकाश भाकिते पुढल्या हाका, चाहूल उद्याची इत्यादी पुस्तकांचा समावेश आहे. भोपाळ दुर्घटना आधारित ‘आकांत’ ही त्यांची विज्ञान कादंबरी विशेष गाजली. या कादंबरीचा मल्याळम भाषेत अनुवाद झाला आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषद, भारतीय भौतिकी परिषद, पुणे मराठी ग्रंथालय, मराठी विज्ञान परिषद अशा विविध संस्थांच्या अनेक पुरस्काराचे ते मानकरी ठरले आहेत. त्यांच्या साहित्याचे विविध भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. त्यांच्या कथासंग्रहांना राज्य शासनाच्या पुरस्कारासह केशवराव कोठावळे पुरस्कारही मिळाला आहे. जावडेकर यांच्या अनेक कथांचे इंग्रजी, कन्नड, मल्याळम, बंगाली भाषांमध्ये तसेच इटालियन स्पॅनिश या परदेशी भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. आज विज्ञान कथा लेखकांमध्ये सुबोध जावडेकर हे नाव प्रामुख्याने अग्रक्रमाने घेतले जाते.
प्रख्यात लेखक, संपादक, आणि थोर समाजवादी विचारवंत आचार्य शं. द. जावडेकर यांचे सुबोध हे नातू, आणि गुरुकुल पद्धतीच्या निवासी शाळा शिक्षण व्यवस्थेचे पुरस्कर्ते श्री प्रभाकर व लीलाताई जावडेकर यांचे सुपुत्र आहेत. जावडेकर यांच्या विज्ञान कथांचा रोख माणसामाणसांमधील नातेसंबंधांवर अवलंबून असतो. या नात्यांचा विविध परिंनी ते सतत शोध घेत राहतात. त्यांच्या बहुतेक कथांमध्ये, यंत्रांमुळे येणाऱ्या परमात्मतेचे भान आहे. जावडेकर यांच्या कथा या विज्ञान आणि माणूस यांच्यातील एकात्म नात्याचा सदैव वेध घेताना दिसतात. या कथा वाचकांचे कुतूहल सदैव जागे ठेवतात, मात्र त्यांना केवळ रंजक मानता येणार नाही. त्यांच्या लेखनातून जे नैतिक प्रश्न निर्माण होतात ते अर्थात वाचकांना अंतर्मुख करायला भाग पाडतात.
सुबोध जावडेकर यांना महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) या संस्थेच्या वतीने मिळालेल्या साहित्य पुरस्काराबद्दल, साहित्य प्रेमी वर्तुळात सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.








