मुंबई / ऑनलाईन टीम
ब्रीच कँडी रुग्णालयाच्या गेटवरुन सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या व्हर्च्युअल सभेची छायाचित्रं सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. शरद पवार रूग्णलयात असल्याने खासदार सुप्रिया सुळे यांना पंढरपूर विधानसभेच्या निवडणूक प्रचार सभेत भाग घेता आलेला नाही. मात्र हार मानतील त्या सुप्रिया सुळे कसल्या हेच या व्हायरल फोटोतून दिसत आहे. अगदी वडील शरद पवार यांच्याप्रमाणेच संकटाना कसे शिंगावर घ्यायचे हे सुप्रिया सुळे यांच्या आजच्या सभेतून दिसून आले. एक मुलगी आणि पक्षाची एक कार्यकर्ता या दोन्ही भूमिका त्यांनी अगदी चोखपणे पार पाडल्या.
झाले असे की वडील शरद पवार रुग्णालयात असल्याने सुप्रिया सुळेंना पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघासाठी प्रत्यक्ष फिरून प्रचार करता आला नव्हता. मग काय सुप्रिया सुळे यांनी आज, बुधवारी ब्रीच कँडी रुग्णालयाबाहेरुनच थेट व्हर्च्युअल सभा घेत पंढरपूरच्या मतदारांशी संवाद साधला. खरंच एकाद्या स्त्रीने जर ठरवले तर ती काहीही करू शकते. असेच काहीसे चित्र आज पाहायला मिळाले.
यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भालके नाना यांच्यासोबत आम्ही पंढरपूरचा चेहरामोहरा बदलायचे ठरवले होते. त्यामुळे भारत भालके आणि पंढरपूरासोबत आमचे एक वेगळे नाते होते. मात्र, नाना अर्ध्या वाटेवर साथ सोडतील असे वाटले नव्हते. त्यामुळे आता विश्वासाच्या नात्याने ही जबाबदारी भगीरथ भालके यांच्यावर सोपविली आहे. आता आपण नानांची अधुरी स्वप्नं पूर्ण करु. त्यासाठी जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसला विजयी करावे, असे आवाहन यावेळी सुप्रिया सुळे यांनी केले.