फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांची ग्वाही
वार्ताहर/ मौजे दापोली
निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणातील बागायतदार पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱयांसाठी जुनी रोजगार हमी योजना राबवून भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेबाबतच्या अटी शिथील करून शेतकऱयांना लाभ दिला जाईल. कोकणातील मुख्य पिक असलेल्या सुपारीचा समावेश फळबागेत करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याची ग्वाही, राज्याचे रोजगार व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिली.
निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या गावांची पाहणी करण्यासाठी फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे बुधवारी दापोली दौऱयावर आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मंत्रीमंडळाची बैठक घेऊन सुपारीचा समावेश फळबागेमध्ये केला जाईल. रोजगार हमीच्या काही अटी शिथील करत वेशेष सूट देण्यासह भरीव मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांनी निश्चित केले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱयांना अधिकाधिक मदत करण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न केले जात आहेत.
नुकसानग्रस्त बागायतदारांना दिलासा मिळण्यासाठी जुनी फळबाग लागवड योजना सुरू करण्याचा विचार सरकार करत आहे. रत्नागिरी, रायगड या दोन्ही जिह्यातील शेतकऱयांसाठी रोजगार हमी योजनेंतर्गत जुनी फळबाग लागवड सुरू करण्यावर आपण ठाम आहोत. लोकांच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत, आता त्यांना रोजगाराची गरज आहे. या बागांची साफसफाई करण्यासाठी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून 100 दिवसाचा रोजगार देण्याचा प्रयत्न आहे. निसर्ग चक्रीवादळात उद्ध्वस्त झालेली झाडे बाजूला करून लोकांना त्या ठिकाणी पुन्हा नवीन लागवड करायची आहे. त्या दृष्टीने कामाला गती देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही भुमरे यांनी सांगितले.









