डेमोक्रेटिक पार्टीतील प्राथमिक निवडणूक फेरी : दक्षिणेतील 9 प्रांतांमध्ये मिळाला विजय
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
सुपर टय़ूजडेच्या प्रायमरीजमध्ये अमेरिकेत अध्यक्षीय पदासाठीचे डेमोक्रेटिक पार्टीतील दावेदार ज्यो बिडेन यांनी मंगळवारी 7 मुख्य दाक्षिणात्य प्रांतांमध्ये विजय मिळविला आहे. या विजयामुळे बिडेन यांच्या दावेदारीला मोठे बळ मिळाले आहे. बिडेन यांच्या विरोधात बर्नी सँडर्स यांना गृहराज्य वरमोंट, कोलोराडो आणि उटा येथे यश प्राप्त झाले आहे. 14 पैकी 9 प्रांतांमध्ये बिडेन यांना विजय मिळाल्याचे समजते.
अलबामा, ओक्लोहामा, टेनेसी, उत्तर कॅरोलिना, आर्कासांस, मिनीसोटा आणि व्हर्जिनियामध्ये बिडेन यांनी विजय मिळविला आहे. मागील शनिवारी दक्षिण कॅरोलिनामध्ये विजय मिळविलेले बिडेन हे सध्या डेमोक्रेटिक पार्टीतील अध्यक्षीय उमेदवारीच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. बिडेन हे अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या शर्यतीत तिसऱयांदा सामील झाले आहेत. यापूर्वी 1998 आणि 2008 मध्येही त्यांनी उमेदवारीवर दावा केला होता.
वरमोंटमध्ये सिनेटर बर्नी सँडर्स आणि न्यूयॉर्कचे माजी महापौर माइक ब्लूमबर्ग यांनी मागील आठवडय़ात चुरशीची लढत दिल्याने बिडेन यांच्याकरता व्हर्जिनियातील विजय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. सँडर्स यांनी अलिकडेच स्वतःच्या संबोधनात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीकेची झोड उठविली होती. तसेच इराकवरील हल्ल्याला बिडेन यांचे समर्थन होते, असा आरोप केला होता. स्वतःच्या प्रचारात वारेमाप निधी खर्च करूनही अब्जाधीश उद्योजक ब्लूमबर्ग यांना अमेरिकेच्या ठराविक भागातूनच समर्थन मिळू शकले आहे.
मंगळवार म्हणजेच सुपर टय़ूजडेला कॅलिफोर्नियासह 14 प्रांतांमध्ये प्रायमरी निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत विजयी ठरलेल्या नेत्याला अध्यक्षीय उमेदवारी मिळणार आहे. 3 नोव्हेंबर रोजी होणाऱया अध्यक्षीय निवडणुकीत हा उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देणार आहे.
दक्षिण कॅरोलिनामध्ये प्रायमरी निवडणुकीत विजयी झाल्यावर बिडेन यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. ‘माझ्यात अद्याप बळ आहे’ अशी घोषणा बिडेन यांनी समर्थकांना संबोधित करताना केली आहे.
अमेरिकेच्या दक्षिण भागातील कृष्णवर्णीय नागरिकांचे बिडेन यांना मोठे समर्थन मिळाले आहे. टेक्सासमध्ये बिडेन यांनी विजय मिळविला आहे. तर कॅलिफोर्नियातील निकाल अद्याप हाती आलेला नाही. कॅलिफोर्नियात सँडर्स यांना मोठे समर्थन प्राप्त होणार असल्याचे मानले जाते. कॅलिफोर्निया आणि माइने प्रांतात सँडर्स आणि बिडेन यांच्यात चुरशीची लढत अपेक्षित आहे. डेमोक्रेटिक पक्षातील दिग्गज नेत्यांनी बिडेन यांना पाठिंबा दिल्याने त्यांचे पारडे जड झाले आहे.









