आजारी असल्याने दिलासा देण्याची केली होती मागणी
वृत्तसंस्था/ पाटणा
चारा घोटाळय़ाच्या एका प्रकरणी लालूप्रसाद यादव यांना सुनावणीस हजर राहण्याप्रकरणी दिलासा मिळाला आहे. बांका कोषागारमधून 46 लाख रुपयांची अवैध उचल केल्याप्रकरणी लालूप्रसाद मंगळवारी पाटण्यातील सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर राहिले. प्रत्यक्ष उपस्थित न राहण्याची सूट देण्याची लालूंची मागणी न्यायालयाने मान्य केली आहे.
मी वारंवार आजारी पडतो, अशा स्थितीत सुनावणीस उपस्थित न राहण्याची अनुमती देण्यात यावी असे राजद प्रमुखांनी महटले होते. याप्रकरणी आता 30 नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. या खटल्याप्रकरणी पाटण्यातील विशेष न्यायाधीश प्रजश कुमार यांच्या न्यायालयाने लालूंसह 28 आरोपींना उपस्थित राहण्याचा आदेश दिला होता. याचमुळे राजद प्रमुख सोमवारी संध्याकाळी दिल्लीहून पाटण्यात दाखल झाले होते.
1996 पासून खटला सुरू
बांका कोषागारातून बनावट बिलांच्या मदतीने 46 लाख रुपयांची उचल करण्याचे प्रकरण 1996 पासून सुरू आहे. याप्रकरणी प्रारंभी तत्कालीन मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यासह 44 आरोपी होते. सद्यकाळात 28 जणांच्या विरोधात खटला सुरू आहे. तर 6 आरोपींचा मृत्यू झाला आहे.
व्हिलचेअरवर लालूप्रसाद
लालू यादव सध्या अनेक आजारांनी ग्रस्त आहेत. हिंडणे-फिरणेही त्यांच्यासाठी अवघड होऊन बसले आहे. जामीन मिळाल्यापासून ते दिल्लीत स्वतःच्या मुलीच्या घरी वास्तव्य करत आहेत. तत्पूर्वी बिहारमध्ये दोन विधानसभा मतदारसंघातील पाटनिवडणुकीकरता त्यांनी प्रचार केला होता. पण दोन्ही ठिकाणी पक्षाचे उमेदवार पराभूत झाल्यावर त्यांची प्रकृती बिघडली होती.









