काळवीट शिकार प्रकरण : शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत 28 रोजी सुनावणी
वृत्तसंस्था/ जोधपूर
काळवीट शिकार आणि शस्त्रास्त्र कायद्याचा भंग केल्याप्रकरणी अभिनेता सलमान खान याला जिल्हा तसेच सत्र न्यायालय, जोधपूरने 28 सप्टेंबर रोजी हजर राहण्याचा आदेश दिला आहे. सलमानने यापूर्वी सुनावणीस गैरहजर राहण्याची अनुमती देण्याची मागणी मान्य करण्यात आली होती. परंतु पुढील सुनावणीसाठी सलमानला जोधपूर न्यायालयात उपस्थित रहावे लागणार आहे.
ऑक्टोबर 1998 मध्ये जोधपूर येथे हम साथ-साथ है या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान सलमान खानावर कांकाणी गावाच्या हद्दीत दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप झाला होता. याप्रकरणी सुमारे 2 दशकांपर्यंत चाललेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने सलमानला दोषी ठरवत 5 वर्षांची शिक्षा सुनावली होती. याप्रकरणी सहआरोपी सैफ अली खान, अभिनेत्री नीलम, तब्बू आणि सोनाली बेंदे यांना संशयाचा लाभ देत निर्दोष ठरविण्यात आले होते.
शिक्षा सुनावण्यात आल्यावर सलमानला तुरुंगात जावे लागले होते. परंतु सध्या तो जामिनावर बाहेर आहे. सलमानने सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान दिले आहे. अशाचप्रकारे 1998 मध्ये परवान्याचा कालावधी संपूनही शस्त्र बाळगल्याचा आरोप सलमानवर आहे. सत्र न्यायालयाने त्याला याप्रकरणी आरोपमुक्त केले होते. परंतु राज्य सरकारने या निर्णयाला आव्हान दिले आहे.