5 लाखांचे नुकसान, 15 लाखाची मालमत्ता वाचवण्यात यश
प्रतिनिधी/ कुंभारजुवे
करमळी येथील श्रीमती सुनंदाबाई बांदोडकर हायस्कुलच्या इमारतीला 16 एप्रिल रोजी रात्री 9च्या सुमारास इमारतीच्या मागील बाजूस लागली. या घटनेची खबर जुने गोवे अग्निशामक दलास कळविण्यात आली. त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यास प्रारंभ केला. नंतर कुंडई अग्निशामक दलाचा बंब येऊन दोन्ही बंबांनी आग आटोक्यात आणली. या आगीत स्टोअररुम, स्टाफ रुम व म्युझीक रुमला आग लागल्याने सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले तर 15 लाखांची मालमत्ता वाचविण्यात यश आले. यात दोन कपाटे, संगीत वाद्ये, छप्पर व अन्य वस्तू खाक झाल्या.
करमळी येथील श्रीमती सुनंदाबाई बांदोडकर हायस्कूलच्या इमारतीला 16 इप्रिल रोजी रात्री 9 च्या सुमारास आग लागल्याची नागरिकांना कल्पना येताच त्यांनी अग्निशामक दलाला कळविले. लगेच जुने गोवे अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी पोहोचला. त्याचबरोबर कुंडई अग्निशामक दलाचा बंबही तिथे येऊन त्यांनी आग आटोक्यात आणली. सरपंच उत्तम मुरगावकर, मोहन माशेलकर, सुरज फातर्पेकर, यांनी मुख्याध्यापक किशोर गोवेकर यांना या घटनेची कल्पना दिली व ते पावणे दहाच्या सुमारास व्यवस्थापन समितीचे खजिनदार रुद्रेश चोडणकर यांच्या समवेत घटनास्थळी पोहोचले. यावेळी या हायस्कूलचे करमळी येथील माजी विद्यार्थी, हायस्कूलचे कर्मचारी हरिश्चंद्र नाईक, रजनीकांत मडकईकर, शिक्षक जयेश भोसले, रोशन आगरवाडेकर, मेधा नाईक, अंजली फडते, स्नेहा महाले आदी उपस्थित होते.
जुने गोवेच्या अग्निशामक दलाचे स्टेशन ऑफिसर रुपेश आर. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली लिडींग फायर फायटर अमीत व्ही. रिवणकर, ड्रायव्हर ऑपरेटर, फायर फायटर के. एन. देसाई, लिडींग फायर फायटर बी. के. शेटकर, ड्रायव्हर ऑपरेटर फायर फायटर वाय. एम. परब, ज. बी. सिनारी, डी. एम. मुझ्षावर, वाय. एस. गावडे यांनी परिश्रम घेऊन आग आटोक्यात आणली.
17 एप्रिल रोजी पहाटे पावणेचारच्या दरम्यान विझवलेल्या जागी परत आग लागल्याचे जुने गोवे अग्निशामक दलाला कळविण्यात आले व त्यांनी घटनास्थळी येऊन आग पूर्णपणे विझवले. दोन्ही घटनेच्या वेळी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी आग आटोक्यात आणण्यास मदत केली.
17 रोजी सकाळी हायस्कूल व्यवस्थापन समितीचे चेअरमन ऍड. चंद्रकांत चोडणकर, खजिनदार रुद्रेश चोडणकर, व्यवस्थापक डॉ. सचिन गोवेकर, मुख्याध्यापक किशोर गोवेकर यांनी आग लागलेल्या इमारतीची पाहणी करून पुढील कार्यवाही करण्याचे निश्चित केले. आग लागलेल्या ठिकाणाची साफसफाई करण्यासाठी सरपंच उत्तम मुरगावकर यांनी पंचायतीतर्फे कामगार पुरवून काम सुरू केले. या दिवशी शिक्षक सुबोध महाले, रश्मी हळदणकर, शिल्पा पेडणेकर, प्रिंदन नाईक व अन्य हायस्कूल कर्मचाऱयांनी भेट दिली.