प्रतिनिधी/ चिपळूण
शहरातील मार्कंडीतील न्यू हिंद विजय मंडळातर्फे पवनतलाव मैदानावर पार पडलेल्या कै. सुधीर भोसले स्मृति ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचा चषक अब्दुल कादीर संघाने पटकावले, तर स्पार्टन इलेव्हन संघ उपविजेता ठरला.
या स्पर्धेत 12 संघांनी सहभाग घेतला होता. अटीतटीच्या सामन्यांमध्ये तिरूपती सावर्डे, अब्दुल कादीर, स्पार्टन इलेव्हन, प्रतिक इलेव्हन लांजा या संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली. या फेरीचा पहिला सामना तिरूपती सावर्डेविरूध्द स्पार्टन इलेव्हन यांच्यात झाला. त्यात विजय मिळवत स्पार्टन संघ अंतिम फेरीत गेला. दुसऱया सामन्यात अब्दुल कादीर संघाने प्रतिक इलेव्हन लांजाचा पराभव केला. त्यामुळे अंतिम लढत स्पार्टनविरूध्द अब्दुल कादीर संघात झाली. प्रथम फलंदाजी करताना अब्दुल कादीर संघाने 6 षटकांत 72 धावा कुटल्या. 73 धावांचे उद्दीष्ट घेऊन मैदानात उतरलेल्या स्पार्टन संघाला 6 षटकांत 64 धावा करता आल्या. त्यामुळे अब्दुल कादीर संघ चषकाचा मानकरी ठरला. विजेत्या संघास 30 हजार 21 रूपये व चषक, उपविजेत्यास 20 हजार 21 रूपये व चषक देऊन गौरवण्यात आले. स्पार्टनचा निखिल वारके उत्कृष्ट गोलंदाज, पुंदन राहिलकर फलंदाज, तर अब्दुल कादीरच्या बाळू सुर्वे याला सामनावीर, मालिकावीर असा दुहेरी मुकुट मिळाला. उद्योजक मुबीन खोत, वहाब बेबल, इम्रान कोंडकरी, संतोष पवार, समीर काझी, बंटी सावंत यांच्याहस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला. या स्पर्धेला आमदार शेखर निकम यांनी भेट देऊन आयोजकांचे अभिनंदन केले.









