दिल्ली येथून सायकल प्रवासाला सुरुवात : गोवामार्गे चेन्नईला जाणार
प्रतिनिधी / बेळगाव
आपल्यासोबतच इतरांचेही आरोग्य सुदृढ राहावे यासाठी दिल्ली येथील उदयभान सिंग देशाच्या भ्रमंतीवर निघाले आहेत. सायकलमुळे आरोग्य सुदृढ राहून सर्व व्याधींपासून दूर राहता येते हे त्यांनी दाखवून दिले आहे. वाटेत भेटेल त्या व्यक्तीला, गावांना सायकलचे महत्त्व ते पटवून देत असतात. नुकतेच ते बेळगावमध्ये दाखल झाले असून, पुढील प्रवासात ते गोव्याला जाणार आहेत.
उदयभान सिंग हे नेव्हीचे निवृत्त जवान आहेत. त्यांनी गोवा, कोची, कोलकाता येथे सेवा बजावली आहे. सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी भारत भ्रमंतीचा उपक्रम सुरू केला. दिल्ली येथून त्यांनी आपल्या प्रवासाला सुरुवात केली. पंजाब, पठाणकोट, लडाख, हैदराबादमार्गे ते गुलबर्गा येथे दाखल झाले. तेथून ते दोन दिवसांपूर्वी बेळगावमध्ये आले, यानंतर गोवा व तेथून चेन्नईला जाणार आहेत.
प्रत्येक गावात गेल्यानंतर तेथील लोकांना ते सायकलचे महत्त्व पटवून देतात. त्यांना ते आपली सायकलही चालवायला देतात. यामुळे लोकांचे सायकलबद्दलचे कुतूहल वाढते आणि त्यातून सायकल चालविणाऱयांची संख्या वाढेल, असा त्यांचा विश्वास आहे.