9963 मतांची आघाडी : सहाव्यांदा विजयी
प्रतिनिधी / फोंडा
मडकई मतदारसंघात मगो पक्षाचे उमेदवार सुदिन ढवळीकर यांनी तब्बल 9963 मतांची मोठी आघाडी घेऊन विजयाची डबल हॅट्ट्रिक साधली आहे. सलग सहाव्यांदा ते मडकईतून विजयी झाले आहेत. दुसऱया स्थानी आलेले भाजपाचे उमेदवार सुदेश भिंगी यांना 4000 तर रिव्होल्युशनरी गोवन्सचे प्रेमानंद गावडे यांना 3488 मते मिळाली.
मडकई मतदारसंघातून एकूण आठ उमेदवार रिंगणात होते. काँग्रेसचे लवू मामलेदार यांना 1090, आम आदमी पक्षाचे उमेश तेंडुलकर यांना 419, गोंयचो स्वाभिमानी पक्षाचे संतोष तारी यांना 190, राष्ट्रवादी काँग्रेसचे रवींद्र तळावलीकर यांना 140 तर जय महाभारत पक्षाचे हरिश्चंद्र नाईक यांना 59 मते मिळाली. 373 मतदारांनी नोटाचा वापर केला.
मडकईत एकूण 23,722 मतदान झाले होते. त्यापैकी सुदिन ढवळीकर यांना 13,963 मते मिळाली. त्यांनी 9963 मतांची मोठी आघाडी मिळविली असली तरी मागील निवडणुकीपेक्षा यंदा त्यांच्या मतांची टक्केवारी काही प्रमाणात घटली आहे. मागील 2017च्या निवडणुकीत त्यांना 13680 मतांची आघाडी मिळाली होती. भाजपाच्या मतांमध्ये किंचित वाढ झाली आहे. मागील निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराला 3413 मते मिळाली होती, तर यंदा 4000 मते मिळाली आहेत. नव्यानेच निवडणूक लढविणाऱया रिव्होल्युशनरी गोवन्सने दखलपात्र कामगिरी केली असून या पक्षाचे उमेदवार प्रेमानंद गावडे यांनी 3488 मते मिळवून तिसरे स्थान पटकावले. काँग्रेसच्या उमेदवाराला मागील निवडणुकीत 1259 मते मिळाली होती. त्यात यंदा घट झाली आहे.









