मडकईतून डबल हॅट्ट्रिकच्या तयारीत : पुढील सरकार मगो-तृणमुलचेच
प्रतिनिधी /फोंडा
मगो पक्षाचे नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी मडकई मतदार संघातून सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सुदिन ढवळीकर हे यंदा सहाव्यावेळी विधानसभा निवडणूक लढवित आहेत. कार्यकर्त्यांचे भक्कम पाठबळ व मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाच्या जोरावर यावेळीही मोठय़ा मताधिक्क्याने विजयी होण्याचा दावा त्यांनी केला.
स्व. भाऊसाहेब बांदोडकर व गोमंतकीय भूमिपुत्रांचा पक्ष म्हणून ओळख असलेल्या मगोचे विधानसभेत कायम अस्थित्त्व राखून ठेवल्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. गेल्या पाच वर्षांत गोव्याचे राजकारण कुठल्या स्थराला पोचले आहे, हे जनता पाहात आहे. एका पक्षातून दुसऱया पक्षात सातत्याने सुरु असलेल्या माकडउडय़ा बंद होण्यासाठी गोव्यात लोकशाहीच्या तत्त्वानुसार पक्षसंघटना बळकट होणे गरजेचे आहे. मतदारांना गृहित धरणाऱया पक्ष बदलू नेत्यांना घरी बसविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. राजकारणाची हिन पातळी गाठलेल्या भाजपाने जनमत गमावले आहे. गोव्यात नवीन सकाळ उजाडण्यासाठी मगो-भाजपा युती हाच एकमेव व योग्य पर्याय आहे, असे ढवळीकर म्हणाले. येणारे सरकार हे युतीचेत असेल असा दावाही त्यांनी केला.
त्याच पेनाने सहाव्यांदा उमेदवारी अर्जावर सही
मडकई मतदार संघातून आपण सहाव्या वेळी उमेदवारी दाखल करीत आहे. 1999 साली पहिल्यांदा उमेदवारी अर्ज भरताना स्वाक्षरीसाठी जे पेन वापरले होते, तेच 23 वर्षांनी पुन्हा वापरीत आहे. सर्व कार्यकर्ते, समर्थक सरपंच, पंचसदस्य यांच्याप्रमाणेच आपल्या खासगी गोष्टींवर आपला विश्वास आहे. त्यामुळेच सलग पाचवेळा विजयी होऊ शकलो. एकच पेन वापरल्याचे उदाहरण देऊन आपण गेले पाच कार्यकाळ एकाच पक्षाशी एकनिष्ठ राहिलो, असे संकेतही त्यांनी दिले. यावेळी मगोचे युवा नेते मिथील ढवळीकर, विविध पंचायतींचे सरपंच, पंचसदस्य, जिल्हापंचायत सदस्य व कार्यकर्ते मोठय़ासंख्येने उपस्थित होते.









