कैरो / वृत्तसंस्था
आफ्रिका खंडातील सुदान देशाचे पंतप्रधान अबदल्ला हॅमडॉक यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे हा देश पुन्हा राजकीय अस्थिरतेच्या भोवऱयात सापडण्याची शक्यता आहे. रविवारी देशाला उद्देशून भाषण करताना त्यांनी पदत्याग करत असल्याची घोषणा केली. या देशात सध्या लोकशाहीवादी नागरीकांनी तीव्र आंदोलन सुरु केले असून सरकारच्या सैनिकांनी त्यांची मुस्कटदाबी चालविली आहे. त्यामुळे देशात अशांतता असून अराजक माजण्याची चिंता व्यक्त होत आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये हॅमडॉक यांनी पदभार स्वीकारला होता. तथापि, त्यांच्याविरोधात बंड झाल्याने त्यांनी पद सोडले आहे.
राजधानी खार्टूम येथे लक्षावधी लोक रस्त्यावर उतरले असून त्यांनी लोकशाहीची मागणी केली आहे. इतर अनेक शहरांमध्येही उग्र आंदोलन होत आहे. हॅमडॉक यांनी ज्या पद्धतीने सत्ता हाती घेतली त्यामुळे या देशातील सर्वसामान्य जनता प्रक्षुब्ध झाली आहे. जनता करीत असलेल्या आंदोलनाला डॉक्टरांच्या संघटनांचा पाठिंबा मिळाल्याने सरकारची अधिकच कोंडी झाली आहे.
काही ठिकाणी आंदोलकांवर गोळीबार करण्यात आल्याने परिस्थिती आणखी चिघळली असल्याचे सांगण्यात येते. या गोळीबारात 24 नागरीक जखमीं झाले आहेत. यात काही लहान मुलांचाही समावेश आहे.









