शिवसेनेची जि. प. सीईओंकडे तक्रारः सभापती, बीडिओंच्या चौकशीची मागणी
प्रतिनिधी / देवगड:
भाजपच्या हळद बियाणे वाटप कार्यक्रमासाठी पंचायत समितीच्या कर्मचाऱयांना सुट्टीच्या दिवशी हजर राहण्याची सूचना पं. स. सभापती व गटविकास अधिकारी यांच्याकडून देण्यात आली. याबाबतचे अधिकार पं. स. सभापतींना आहेत का? ते अधिकार कोणत्या नियमात आहेत? या कार्यक्रमाचा बॅनर पं. स. सभागृहातील छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाच्या ठिकाणी लावण्यात आला होता. हा महाराजांचा अवमान असून जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या गंभीर प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे देवगड तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
साळसकर यांनी निवेदनात म्हटले आहे, 19 जून रोजी सकाळी 10 वाजता देवगड पंचायत समितीच्या छत्रपती संभाजी महाराज सभागृहामध्ये भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱयांच्या उपस्थितीत हळद बियाणे वाटप कार्यक्रम घेण्यात आला होता. तत्पूर्वी, 17 जून रोजी पं. स. सभापतींनी गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांना पत्र देऊन 19 रोजी रजेच्या दिवशी पं. स. च्या सर्व कर्मचाऱयांना उपस्थित ठेवण्याबाबतची सूचना केली. त्यानुसार गटविकास अधिकारी परब यांनी 18 रोजी लेखी आदेश काढून पं. स. च्या कर्मचाऱयांना 19 रोजी कार्यालयात हजर राहण्याबाबतची सूचना केली. सुट्टीच्या दिवशी कर्मचाऱयांना उपस्थित ठेवण्याबाबतचे अधिकार पं. स. सभापतींना आहेत का? व ते कोणत्या नियमात आहेत? याचा खुलासा करण्यात यावा, अशी मागणी साळसकर यांनी केली आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान
भाजपच्या या कार्यक्रमाचा बॅनर सभागृहात छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाच्या ठिकाणी लावण्यात आला होता. हा प्रकार छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणारा असून जनतेच्या भावना दुखावणारा आहे. छत्रपती संभाजी महाराज यांना अवमानीत करून कार्यक्रम राबविण्याचे अधिकार सभापती व गटविकास अधिकारी यांना कोणी दिले? तसेच कार्यालयीन सुट्टीच्या दिवशी पं. स. आस्थापनातील मालमत्ता राजकीय पक्षाच्या कार्यक्रमाला वापरण्याचाही अधिकार त्यांना आहे का? असा सवालही साळसकर यांनी उपस्थित केला आहे.
अन्यथा, पं. स. आवारात आंदोलन
गटविकास अधिकारी परब यांच्या पं. स. कारभारातील हा संपूर्ण प्रकार गंभीर स्वरुपाचा आहे. या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी. येत्या पंधरा दिवसांच्या आत लेखी खुलासा न भेटल्यास पंचायत समिती आवारामध्ये शिवसेनेच्यावतीने उर्ग आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही साळसकर यांनी निवेदनातून दिला आहे. या निवेदनावर तालुकाप्रमुख मिलिंद साटम, शहरप्रमुख संतोष तारी, देवगड- जामसंडे विभागप्रमुख तुषार पेडणेकर यांच्या सहय़ा आहेत.









