रोजगार हमी योजनेची कामे सुरु झाल्याने शेतकरी चिंतेत
वार्ताहर/ कडोली
ऐन सुगीच्या तोंडावर रोजगार हमी योजनेची कामे सुरु करण्यात आली असून दाटून येत असलेल्या आभाळाखाली मजुरांविना सुगी हंगाम लगबगीने साधायचा कसा? असा प्रश्न शेतकऱयांच्यासमोर पडला आहे.
संपूर्ण पावसाळी हंगामात पावसाने भात पिकासाठी चांगली साथ दिली असून भात पीके तरारुन आली आहेत. कडोली, जाफरवाडी, गुंजेनहट्टी, देवगिरी, अलतगा आदी शिवार फिकट पिवळ्या रंगाने अच्छादून गेले आहे. सुगी हंगामाला आता सुरुवात होणार शेतकरी जोडणीच्या तयारीला लागला. कडोली परिसरात सुगी हंगाम मोठय़ा प्रमाणात साधला जातो. मजुरांची तितकीच आवश्यकता असते.
भात पिकाच्या अंतिम टप्प्यात हुऱयाचा प्रादूर्भाव होऊन भाताचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होते. तर दुसरीकरडे पावसाची भीती असते. रोज दाटून येत असलेल्या आभाळाच्या छायेखाली भाताची सुगी लगबगीने पार पाडावी लागते. यासाठी जास्त मजूर घेणे गरजेचे आहे. परंतु आता महत्त्वाच्या क्षणी ऐन सुगीच्या तोंडावर ग्राम पंचायतीने रोजगार हमी योजनेची कामे सुरु केल्याने मजुरांची टंचाई मोठय़ा प्रमाणात भासणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात संतप्त प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत. तेव्हा ग्राम पंचायतीने शेतकऱयांची गरज लक्षात घेऊन रोजगार हमी योजनेची कामे काही दिवस पुढे ढकलावीत, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.









