हनुमान शास्त्री यांचे प्रतिपादन : मलिकवाड येथे भाषाबांधव्य परिसंवाद
वार्ताहर / मलिकवाड
कोणतीही भाषा, परिसंवादाचे काम करते. संस्कार कोणत्याही भाषेत असले तरी महत्वाची भूमिका पार पाडतात. सुसंस्कारीत पिढी निर्माण करण्यासाठी बालकांवर संस्कार करण्याची जबाबदारी पालकांच्यावरच असते. घर ही सर्वांची पहिली शाळा असल्याने पालकांनी मुलांच्यावर कोणताही दुष्परिणाम होणार नाही याचे भान ठेवून स्वतःचे वर्तन ठेवावे. त्यांना नैतिक मुल्यांसह जीवन जगण्याचा उपदेश करावा, असे आवाहन कमतेनट्टी येथील हनुमंत शास्त्री यांनी केले.
मलिकवाड येथे साफल्य समाज सेवा संस्था व ग्राम पंचायत मलिकवाड यांच्या संयुक्त आश्रयाखाली आयोजित करण्यात आलेल्या भाषाबांधव्य या परिसंवादाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. माजी सैनिक शंकर मंगावे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. ग्रामपंचायत सदस्य पुंडलिक व हनुमंत शास्त्री यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी शेडबाळ येथील साहित्यिक महादेव आलासे यांनी बहुभाषा आवश्यक असून राज्यात अनेक भाषांचा आदर केला जातो. स्थानिक भाषेतूनच जगण्याच्या वेदना प्रखरपणे मांडता येत असल्याचे सांगितले. ग्रामपंचायत विकास अधिकारी महेशकुमार यांनी असे सांस्कृतिक वसा जपणारे कार्यक्रम खेडोपाडय़ात होणे आवश्यक असल्याचे सांगितले.
यावेळी कन्नड व संस्कृती खात्याच्यावतीने आयोजित करण्यात आलेले सुगमसंगीत व जानपद कला प्रदर्शन करण्यात आले. गोकाक येथील बसवराज हिरेमठ यांच्या कपरट्टेश्वर संगीत पथकाच्यावतीने सुगम संगीताचा तर इंगळी येथील गिरीश चौगुले यांच्या बसवेश्वर जानपद भजन पथकाच्यावतीने भजनाचा कार्यक्रम करण्यात आला. मलिकवाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समुदाय भवनात झालेल्या या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब पाटील, ग्रामपंचायत सदस्या अनिता इंगळे, लक्ष्मी नडविमनी, अनिता लक्कोळे, शमा जमादार, माजी ग्रामपंचायत अध्यक्षा चांदबी नदाफ, आशा कार्यकर्त्या भारती बाकळे, अण्णागौडा पाटील, गिरीष चौगुले, एम. डी. आलासे, विष्णू हलगेकर, आण्णासो केरुरे यांच्यासह विविध महिला संघाच्या पदाधिकारी व सदस्या उपस्थित होते.
यावेळी नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. सुप्रिया कलाचंद्र यांच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. साफल्य संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कोळी यांनी स्वागत तर राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते भरत कलाचंद्र यांनी प्रास्ताविक केले. सुजाता मगदूम यांनी सूत्रसंचालन तर ग्राम पंचायत कार्यदर्शी मल्लीकार्जुन कांबळे यांनी आभार मानले.









