16 राज्ये आहेत आघाडीवर : कर्नाटक, महाराष्ट्राचा समावेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एप्रिलनंतर कोरोनामुळे देशभरातील व्यवसायांना लॉकडाऊनमुळे फटका बसला होता. त्यानंतर म्हणजेच जून-जुलैनंतर परिस्थितीत सुधारणा होऊन आता उद्योग वेगाने गती घेताना दिसत आहे.
सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगातील हालचालींना वेग आला असल्याचे दिसून आले आहे. परिस्थितीत बऱयापैकी सुधारणा होत असल्याचे स्टार्टअप कंपनी ओके पेडिट यांनी केलेल्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. त्यांच्या अहवालानुसार 16 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील व्यवहारांमध्ये तेजी दिसून आली आहे. कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली यांनी उद्योगांमध्ये कोविडपूर्व परिस्थितीत येण्याचा काठोकाठ प्रयत्न केला आहे. बिहार, हरियाणा, आसाम, राजस्थान आणि हिमाचलसारख्या राज्यांनी व्यवसायात 10 टक्के इतकी गती दर्शवली आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, उत्तराखंड आणि पंजाब या राज्यातही व्यावसायिक हालचाली मोठय़ा प्रमाणात वाढल्या आहेत. त्याचबरोबर टायर 2 आणि टायर 3 शहरांनी टायर 1 शहराच्या तुलनेमध्ये जास्त गतीने प्रगती केली आहे. यात डिजिटल व्यवसायाने जास्त हातभार लावला असल्याचे सांगण्यात येत आहे.








