सौदर्यात नखांचे सौंदर्य हा देखील एक अविभाज्य भाग झाला आहे. नखे कधी नुसते रंगीबेरंगी नेलपेंट लावून सजवली जातात तर कधी मूळच्या नखावर कृत्रिम नख लावून त्यावर नेल आर्टही केले जाते. कोणताही रंग न लावताही नखे सुंदर आणि निरोगी कशी राखता येतील ते पाहू.
- आहारात हिरव्या भाज्या, शेंगभाज्या, सुका मेवा, लाल व पिवळ्या रंगांची फळे आणि भाज्या, काकडी, लिंबू वर्गातील फळे, शेंगदाणे, अंडी, दूध आणि मोड आलेली कडधान्ये नियमीत असावीत.
- नखे तुटत असल्यास नखांना रात्री झोपताना कापसाने खाद्यतेल लावावे. साजुक तूपही रोज रात्री नखांना लावता येईल. त्यातील स्निग्धतेचा नखांना फायदा होतो.
- काकडीची चकती नखांवर चोळून लावल्यानेही फायदा होतो.
- नेलपेंट रिमूव्हर वापरल्यानंतर नखांवर कोरफडीचे जेल चोळावे. यामुळे नखांचा कोरडेपणा कमी होतो.
नखांच्या विद्रुपतेची कारणे
- कावीळ, संधिवात, सोरायसिस या आजारात नखे पिवळी पडू शकतात.
- श्वसनाच्या तक्रारी, फुफ्फुसांचे व हृदयाचे काही आजार यात नखे काळी – निळी पडण्याची शक्यता असते.
- काही वेळा अपघातात मार लागून नखांच्या पापुद्रय़ात हवेचा बुडबुडा तयार होतो. त्यामुळे नखांवर पांढरे ठिपके दिसतात.
- जीवनसत्व व प्रथिनांचे शोषण पुरेसे होत नसल्यास नखांवर उभे पांढरे पट्टे दिसतात.
- नखे सरळ व फुगीर हवीत. त्यांचा आकार तळाशी अर्धगोलाकार असावा.
- नखांचा रंग नैसर्गिक लालसर गुलाबी असावा.
- नेलपेंट चांगल्या दर्जाचे नसल्यास त्यामधील रसायनांमुळे नखे विद्रुप दिसू लागतात.









