ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ब्रिटनला होणारा कोरोना लसींचा पुरवठा तात्पुरत्या काळासाठी थांबवला आहे. देशातील वाढती कोरोना संख्या आणि लसीकरण कार्यक्रमाच्या आधारे हा निर्णय घेत असल्याचे सीरमने शुक्रवारी सांगितले.
सीरमने मागील काही आठवड्यांपूर्वीच ब्रिटनला 50 लाख कोरोना लसीचे डोस दिले आहेत. मात्र, सध्या भारत सरकारचा लसीकरण कार्यक्रम पाहता ब्रिटनला लस निर्यात करणे शक्य होणार नाही. मात्र, काही दिवसांनंतर ब्रिटनला कोरोना लसीचा पुरवठा करण्याचा आम्ही प्रयत्न करू, असे सीरमने म्हटले आहे.
दरम्यान, ब्रिटनमध्ये लसीकरणासाठी सीरमच्या लसीचा वापर करण्यात येत आहे. सीरमने यापूर्वीच लसींचा पुरवठा कमी करत आणला होता. त्यामुळे या देशात लसीकरणाचा वेग मंदावला होता. ब्रिटनला लसीकरणासाठी अजून 17 लाख डोसची गरज असतानाच सीरमने पुरवठा थांबवल्याने ब्रिटनची चिंता वाढली आहे.









